

नवी दिल्ली : राजकारणात नको असणारे लोक समाजकारणात पाठवा असे होऊ नये आणि आता सगळ्या पंगती एकच आहेत, त्यामुळे पंगतीत बसणाऱ्या पेक्षा वाढपी झालो तरी काय हरकत नाही. कुठे तरी २ मर्सिडीज मिळाल्या की पद मिळतात, असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या आणि नाव न घेता उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. तसेच ना. सी. फडक्यांच्या कल्पनेतील प्रेम आता जिवंत असेल तर त्यांचे अभिनंदन करते, अशीही मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.
साहित्य संमेलनात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची 'आम्ही असे घडलो' या कार्यक्रमात मुलाखत झाली. यावेळी त्यांनी शाळा, महाविद्यालय, सामाजिक कार्य आणि राजकारण अशा विषयांवर संवाद साधला. यात त्यांच्या ‘२ मर्सिडीज मिळाल्या की पद मिळतात’, या वक्तव्याची चर्चा होती. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कवयित्री ते राजकीय कार्यकर्ती या प्रवासात बालपणीचे शिक्षण महत्वाचे आहे, इयत्ता सातवीत पहिली कविता लिहिली, कथाही लिहिल्या, वडील डॉक्टर होते त्यांनी फ्रांसमधून उच्च शिक्षण घेतले होते. चांगले संस्कार आई वडिलांकडून मिळाले होते. पंढरपूरला आजोबांच्या कपाटातील सर्व पुस्तकं वाचून काढली.
सामाजिक कामाबाबत बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सुरुवातीला कुमार सप्तर्षी, डॉ. रत्नाकर महाजन या ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनात काम करत होते. पुढे आणखी काही पुस्तके वाचली. बुवा तिथे बाया आणि आणखी काही गोष्टी वाचल्या तेव्हा अंधश्रद्धा काय भयानक प्रकार आहे तो कळला. स्त्री- पुरुष भेद आणि अनेक सामाजिक समस्या कळल्या. केशवपन थांबवण्यासाठी प्रयत्न केले. अनेक ठिकाणी अत्याचार घडल्यावर आपण जातो मात्र अत्याचार होऊ नयेत म्हणून जावे यासाठी जाणे महत्वाचे असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाले.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, विद्यापीठ नामांतरापूर्वी अटक झाली तेव्हा त्या गर्भवती होत्या, त्यावेळी महिला सहकार्याच्या प्रेमाने स्वतःला मजबूत ठेवू शकले. नंतर स्त्री आधार केंद्र, दलित चळवळीत काम करत होते, सामाजिक कामाचा व्याप सतत वाढत गेला, ठरवूनही दवाखान्यात जाऊ शकत नव्हते. त्यामुळे जड अंतकरणाने दवाखाना बंद करण्याचा निर्णय घेतला.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राजकीय जीवनात बाळासाहेब ठाकरेंनी संधी दिली, तुम्हाला हवे ते काम करा, तुमच्या कामात आडकाठी आणणार नाही हा विश्वास दिला. शरद पवारांनी १९९१ साली यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काम करण्यात सांगितले. ६ वर्षे तिथे काम केले. सामाजिक कामात निवेदन देणार आणि राजकारणात निर्णय घेणारे असतात. त्यामुळे तिथे यावे असे वाटले. तत्पूर्वी काही नेत्यांनी केवळ आश्वासने दिल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, बाळासाहेबांचे पक्षात सगळीकडे लक्ष होते. त्यांचे पुत्र म्हणुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा खूप आनंद झाला, मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत, ३-४ वेळा कोविड चाचणी करूनही वेळ मिळत नाही तर काय करावे आणि नेत्यांना संपर्कच ठेवायचा नसेल तर काय असा उद्विग्न प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेत आले, शिवसेनेत आहे आणि शिवसेनेच्या भगव्यातच वर जाणार, असेही त्या म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना त्या म्हणाल्या की, एकदा जय भीम, जय महाराष्ट्र म्हटल्यामुळे एका आमदारांनी तसे का म्हटले असे विचारले, पुढे पुन्हा विचारलेत्यामुळे रडू कोसळले. यासंबंधी वर्तमानपत्रात एक बातमी आली, बाळासाहेबांनी ती वाचली आणि भेटायला बोलवले, तुला कोण अडवते ते बघतो, तू जय भीम म्हण, असे म्हणत आधार दिल्याचे त्यांनी सांगितले आणि त्या भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
माझी मुलाखत राजकीय विषयांवरच जास्त होईल, असे मला वाटलेच होते. मात्र आजपर्यंत मी स्वतः ३० पुस्तके लिहिली आहेत. काहींनी माझ्यावरही पुस्तक लिहिली आहेत, त्याबद्दलही प्रश्न विचारा, असे म्हणत मुलाखतकारांच्या राजकीय प्रश्नांना उत्तर दिले.