

बिलासपूर ( छत्तीसगड ) : एखाद्या महिलेचा हात पकडणे, तिला ओढणे आणि आय लव्ह यू म्हणणे हे भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४ अंतर्गत विनयभंग ठरते, असा महत्त्वपूर्ण निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. एका १९ वर्षीय तरुणाने शालेय विद्यार्थिनीसोबत केलेल्या गैरवर्तनाच्या प्रकरणात न्यायालयाने ही टिपणी केली.
ही घटना घडली तेव्हा आरोपीचे वय १९ वर्षे होते. पीडित मुलगी शाळेतून परतत असताना आरोपीने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले आणि आय लव्ह यू म्हटले होते. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने त्याला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायालयाने आरोपीचा गुन्हा कायम ठेवला; मात्र त्याच्या वयाचा विचार करून शिक्षेत बदल केला. आरोपीने या कृत्याव्यतिरिक्त इतर कोणतेही गंभीर कृत्य केले नसल्याचे नमूद करत न्यायालयाने त्याची तीन वर्षांची शिक्षा कमी करून एक वर्ष केली आहे.