

नवी दिल्ली : मंगळवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सांगितले की, मी मासे खात नाही, शाकाहारी आहे. भाजप खासदार राजीव प्रताप रुडी मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला पुरवणी प्रश्न विचारत असताना सभागृहात ही घटना घडली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या मासे खाण्यावर भाष्य केले.
खासदार प्रताप रुडी म्हणाले की, देशातील ९५ कोटी लोक मासे खातात आणि एक कोटी लोक मासे उत्पादन करतात. अध्यक्ष महोदय, तुम्ही मासे खाता की नाही हे मला माहित नाही. यावर बिर्ला म्हणाले की, मी खात नाही. मी शाकाहारी आहे. तसेच खासदार प्रताप रुडी म्हणाले की, माझा प्रश्न राष्ट्रीय हिताचा आहे. यावेळी बिर्ला यांनी त्यांना उत्तर देताना सांगितले की, या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेले सर्व प्रश्न राष्ट्रीय हिताचे आहेत.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, जेव्हा जदयूचे राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह मंत्री नव्हते, तेव्हा ते विचारायचे की त्यांना हिलसा (एक प्रकारचा मासा) कधी खाऊ घालणार. यावर लोकसभा अध्यक्षांनी सल्ला दिला आणि प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. दुसरीकडे, प्रश्नाचे उत्तर देताना, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह म्हणाले की, गेल्या दशकात देशातील मत्स्य उत्पादनात १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.