

हैदराबाद; वृत्तसंस्था : नवजात बालके पळवून नेऊन ती विकणार्या आंतरराज्य टोळीला पोलिसांच्या विशेष पथकने पकडले. या टोळीच्या सूत्रधारासह 12 जणांना अटक कण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये रुग्णालयातील एजंटांचाही समावेश आहे. तेलंगणातील सायबराबाद पोलिसांनी ही कारवाई केली.
ही टोळी विविध राज्यांतून नवजात बालकांची तस्करी करून निपुत्रिक जोडप्यांना सुमारे 15 लाख रुपयांना विकत असल्याचे तपासात उघड झाले आहे. मधुपूरचे डीसीपी ऋतुराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पळवलेली मुले जेमतेम काही दिवसांची होती. देशभरात ही टोळी मुले पुरवत होती. तसेच मुले दत्तक घेण्याची बनावट कागदपत्रेही तयार केली जात होती. या टोळीने हैदराबाद परिसरातच किमान 15 बालकांची विक्री केली होती.
आरोपींनी आठ वेगवेगळ्या रुग्णालयांतील कर्मचारी आणि दलालांशी संपर्क ठेवला होता. हे एजंट गरीब पालकांकडील किंवा नको असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांची श्रीमंत ग्राहकांना विक्री करत असल्याचेही उघड झाले आहे. सायबराबाद पोलिस सध्या संबंधित रुग्णालयांची नोंदवही आणि बँक खात्यांची सखोल तपासणी करत आहेत.