

शहीद भगतसिंग (Bhagat Singh), राजगुरू (Rajguru), सुखदेव (Sukhdev) यांचे बलिदान देशवासियांना नेहमीचे प्रेरणा देणारे ठरते. या सुपुत्रांनी मातृभूमीसाठी हसतमुखाने बलिदान पत्करले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देशभरात आज (दि. 23 मार्च) शहीद स्मृती दिन (Shaheed Diwas 2025) मानला जातो. या तिन्ही शहिदांचे स्मृतिस्थळ भारत- पाक सीमेवरील हुसैनीवाला (Hussainiwala) येथे आहे. या स्मारकाला प्रस्तुत प्रतिनिधीने अलिकडेच भेट दिली. फारशी माहिती नसणार्या या स्मारकाबद्दल विशेष नोंदी.
शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्मृतिस्थळ हुसैनीवाला येथे असून, पंजाबातील फिरोजपूरपासून 11 किमी अंतरावर आहे. या तिन्ही वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या या स्मारकामुळे ‘शहिदोंकी धरती’ the land of martyrs असा उल्लेख फिरोजपूरचा केला जातो. ब्रिटिशांच्या जोखडातून भारतमाता मुक्त व्हावी म्हणून अनेक क्रांतिकारकांनी बलिदान केले. त्यात शहीद भगतसिंग यांना विसरणे शक्यच नाही. लाहोर येथे ब्रिटिश अधिकारी जॉन सॉन्डर्स याची 17 डिसेंबर, 1928 मध्ये त्यांनी गोळ्या घालून हत्या केली. तसेच नंतर पलायन करीत दिल्ली सेंट्रल अॅसेब्ली हॉलमध्ये बॉम्बफेक केली. त्यानंतर तिन्ही क्रांतिकारक पकडले गेल्यानंतर त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि दोषी ठरवून फाशीची शिक्षा जाहीर झाली. फाशी टाळण्यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न करूनही ब्रिटन सरकार शिक्षेवर ठाम राहिल्यानंतर देशात मोठा प्रक्षोभ निर्माण झाला. या वीरांना फाशी देण्याची तारीख 24 मार्च, 1931 ठरलेली असताना उद्रेक टाळण्यासाठी एक दिवस अगोदरच 23 मार्च रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास त्यांना लाहोर येथे फासावर चढविण्यात आले. या घटनेची माहिती लोकांना कळाल्यानंतर लोक मोठ्या संख्येने लाहोर जेलकडे रवाना झाले. तेव्हा या तिघांचे पार्थिव ब्रिटिश अधिकार्यांनी मागील दाराने बाहेर काढून लाहोरजवळ असलेल्या हुसैनीवाला येथे आणले आणि तेथे दहन केले. तसेच त्यानंतर लगतच असलेल्या सतलज नदीत अर्धवट जळालेले मृतदेह टाकून दिले. या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर ‘इन्कलाब झिंदाबाद’ चे नारे देत जमाव हुसैनीवाला येथे आला. तोपर्यंत ब्रिटिश सैनिक पळून गेले होते. तेव्हा तेथे असणार्या पार्थिवाचे काही भागाचे दहन करण्यात आले आणि त्या जागेवर समाधी बांधण्याचा निर्णय लोकांनी घेतला. कोट्यवधी भारतीयांचे प्रेरणास्थान असणार्या या वीरांचे स्मारक फिरोजपूरजवळ हुसैनीवाला येथे असल्याने या जिल्ह्याची देशात ओळख शहिदांची भूमी असा केला जातो.
1947 ला भारताचे विभाजन होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. सर रॅडक्लिफ यांच्याकडे उभय देशांच्या सीमांचे काम देण्यात आले होते. त्यांनी पंजाबातील 553 किमीची सीमा रेषा निश्चित झाली. दुर्देवाने विभाजनानंतर हुसैनीवाला गाव पाकिस्तानात गेल्यामुळे तेथील सरकारने समाधीकडे फारसे लक्ष दिले नाही. विभाजनाचा वणवा शांत झाल्यानंतर समाधीस्थान भारतात असावे, अशी मागणी जोर धरू लागली. अखेरीस तत्कालिन पंतप्रधान पं. जवाहलाल नेहरू यांनी सीमेजवळच असणार्या फजिल्का जिल्ह्यातील 12 गावे पाकिस्तानला देण्याचे आणि त्याबदल्यात हुसैनीवाला हे गाव भारताला देण्याचा करार केला. करार 1961 ला झाला. चौदा वर्षानंतर हुसैनीवाला भारताला मिळाले. त्यावेळी एका गाव मिळविण्यासाठी 12 गावे का दिली, हे छुप्पे विभाजन नाही का अशी टीका झाली होती. हुसैनीवाला येथे बॉर्डर पोस्ट असून, पंजाबात अटारी - वाघा, सादिकी येथे अन्य दोन बॉर्डर पोस्ट आहेत.
मुस्लिम संत गुलाम हुसैनीवाला यांच्या वास्तव्यावरून हुसैनीवाला हे नाव पडले. हुसैनी यांचा पीर येथे असून, बीएसएफच्या कक्षेत आहे. हुसैनीवाला हे भारतीय सीमेवरील शेवटचे गाव असून पाकिस्तान सीमेवर दुसर्या बाजुने असणार्या गावाचे नाव गंडा सिंग वाला आहे. गंडा सिंग हे शीख लष्करी अधिकारी ब्रिटिश सैन्यदलात होते. मेजर म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत ब्रिटिशांनी त्यांचे नाव गावाला दिले आहे. (या गावाचे पूर्वींचे नाव कासूर होते.) लाहोरपासून हे गाव 56 किमी अंतरावर आहे.
शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे आकर्षक पुतळे, समाधीस्थान, त्यांच्या कार्याची माहिती असणारे फलक स्मारकात आहेत. म्युझियममध्ये शहीद भगतसिंग यांनी ब्रिटीश अधिकार्याला मारण्यासाठी वापरलेले पिस्तूल असून, म. गांधी, भगतसिंगांचे पत्र, न्यायालयीन दस्ताऐवज आहे. याशिवाय काही छोटी शस्त्रास्त्रे ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी भगतसिंग यांच्या मातोश्री विद्यावती यांचीही समाधी आहे. विद्यावती यांचे निधन एक जून 1975 साली झाले. आपल्यावर भगतसिंग यांच्या समाधीशेजारी अंत्यसंस्कार करावेत, अशी त्यांची इच्छा होती. या इच्छेचा सरकारने सन्मान ठेवला. अशीच इच्छा भगतसिंग यांचे सहकारी बटुकेश्वर दत यांचीही होती. दिल्ली अॅसेम्बीलत बॉम्ब फेकताना बटुकेश्वर हे भगतसिंग यांच्या सोबत होते. भगतसिंगांप्रमाणे त्यांच्यावरही खटला चालू होता. पण दोषी न आढळल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बटुकेश्वर यांचे 20 जुलै, 1965 रोजी निधन झाले. त्यामुळे याठिकाणी विद्यावती आणि बटुकेश्वर यांचीही समाधी आहे. या सीमेवर दररोज संध्याकाळी पाच वाजता भारत आणि पाकिस्तान सैन्यामध्ये रिट्रीट समारंभ आयोजित करण्यात येतो. 1970 पासून ही परंपरा सुरू आहे.
हुसैनीवालाचा हा परिसर बीएसएफ आणि आर्मीच्या ताब्यात आहे. ही समाधी नसून प्रेरणास्थळ असल्याने समारकाची कल्पना पुढे आली. तेव्हा केंद्रात संरक्षणमंत्री असणारे यशवंतराव चव्हाण यांनी त्यासाठी पुढाकार घेतला, यशवंतरावांच्या हस्तेच 1965 साली स्मारकाचे भूमीपूजन झाले. परंतु नंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात निर्माण झालेल्या तणावामुळे कामामध्ये अडथळे निर्माण झाले. तीन वर्षानंतर 1968 साली या स्मारकाची उभारणी पूर्ण झाली आणि स्मारक देशाला अर्पण करण्यात आले. दुर्देवाने, 1971 च्या युद्धात पाकिस्तानी सैन्य हुसैनीवाला स्मारकाजवळ धडकले आणि त्यांनी तेथे असणारे शहिदांचे पुतळे ताब्यात घेतले. या युद्धात भारताने विेजय मिळविल्यानंतर पंजाबचे तत्कालिन मुख्यमंत्री ग्यानी झैलसिंग यांनी पुतळे पाकिस्तानातून परत आणले व समाधीची पुनर्बांधणी केली.
भगतसिंग हे मूळचे पंजाबचे. क्रांतिकार्यात सहभागी होण्यापूर्वी त्यांचा लेखन, पत्रकार, नाट्य चळवळीशीही संबंध आला. 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला ते पत्रकार म्हणून उपस्थित होते. तेथून परतत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट दिली आणि रायगडावरील माती कपाळाला लावून स्वातंत्र्यांच्या प्रतिज्ञेचा पुनरूच्चार केला. लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला करणार्या ब्रिटिश अधिकारी जेम्स कॉट यांना मारण्याचा त्यांचा कट होता, पण चुकून गोळी जॉन सॉन्डर्स यांना लागली. त्यात त्यांचा अंत झाला. या गोळीबाराचे सूत्रधार भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी सारा परिसर पिंजून काढला. परंतु हे तिघेही लाहोरबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाले. कालांतराने दिल्ली विधानसभेत बॉम्बफेक करताना त्यांनी पलायन न करता तेथेच उभे राहिल्याने त्यांना पकडण्यात आले. सुखदेव हे लुधियानाचे. राजगुरू हे महाराष्ट्रातील. लाहोरनंतर राजगुरू हे काही काळ काशी येथे वास्तव्यास गेले. 1929 मध्ये त्यांना पुणे पोलिसांनी पकडले. या तिघांवर खटला चालविण्यात आल्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली. तेव्हा भगतसिंगांचे वय होते 23, शिवराम हरी राजगुरू 22, सुखदेव 23.
या तिन्ही वीरांना अभिवादन करण्यासाठी 23 मार्च रोजी शहीद दिन पाळला जातो. हुसैनीवाला येथे मोठा कार्यक्रम होत असतो, याशिवाय याठिकाणी वसंत पंचमीला विशेष देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कारण भगतसिंगांचे ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे अतिशय आवडते गाणे होते. कारागृहात असताना ते कैद्यांकडून गीत म्हणून घेत असत. क्रांतिकारकांमध्ये हे गीत अतिशय लोकप्रिय आहे.
भगतसिंग यांचे मूळ गाव भगतसिंग नगर जिल्ह्यातील खटकर कला हे आहे. त्यांचे पूर्वज या गावात रहात असत. भगतसिंग यांचा जन्म आता पाकिस्तानात असलेल्या बंगा या गावात झाला होता. विभाजनानंतर भगतसिंग यांच्या मातोश्री आणि अन्य सदस्य मूळ गावात परतले. भगतसिंग यांची रक्षा, रक्त लागलेला कागद, लाहोर येथे दिलेली गीतेची प्रत व अन्य वस्तू असणारे संग्रहालय गावात आहे. भगतसिंग यांचे दुसरे सहकारी सुखदेव थापर हे पंजाबातील लुधियानाचे रहिवासी होते. लुधियानात त्यांच्या निवासस्थानी पुतळा असून, सुखदेव यांचे नाव बससेवा आणि शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर हे नाव राजगुरूंच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.
भगतसिंग यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारी अनेक पुस्तके आहेत. भगतसिंगांचे आयुष्य आताच्या पाकिस्तानात गेले असल्याने अनेक कागदपत्रे त्या देशात आहेत. दिवगंत पत्रकार कुलदीप नायर यांनी ही कागदपत्रे भारताकडे सुपुर्द करावीत, यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानी अधिकार्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. परंतु त्यांना फार प्रतिसाद न मिळाल्यामुळे शहिदांचा इतिहास अपूर्णच राहिला, असे म्हणावे लागते. नायर यांनी भगतसिंग यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे ‘Without Fear - The Life & Trial of BHAGAT SINGH’ हे पुस्तक लिहिले असून, त्याचा मराठी अनुवाद ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार यांनी ‘ भयमुक्त होऊन मरणाला कवेत घेणार्या भगत सिंग यांचा अखेरपर्यंतचा जीवनप्रवास...’ या पुस्तकात मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.