नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पुढील अध्यक्षांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून तर राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून बैठकीला उपस्थित होते. राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्यानंतर त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही पहिलीच भेट होती.
निवृत्त न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांचा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ १ जून रोजी पूर्ण झाल्यापासून अध्यक्षपद रिक्त आहे. निवृत्त न्यायमूर्ती मिश्रा यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर आयोगाच्या सदस्या विजया भारती सयानी या काळजीवाहू अध्यक्षा झाल्या.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आठवे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. जून २०२१ मध्ये त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नियमन करणाऱ्या कायद्यानुसार, आयोगाच्या अध्यक्षाची निवड करणाऱ्या समितीचे पंतप्रधान अध्यक्ष असतात. तर लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्यसभेचे उपसभापती सदस्य असतात. भारताचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींद्वारे मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाते.