पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद, या कंपनीची प्रवर्तक बाबा रामदेव आणि इतरांना कोव्हिड मुत्यू प्रकरणीच्या जाहिराती हटवण्याचे आदेश दिले आहेत. कोव्हिड साथीच्या काळात पतंजलीने कोरनिल हे आयुर्वेदिक औषध बनवले होते. या औषधाच्या जाहिराती करताना कोव्हिडमुळे होत असलेल्या मृत्यूसाठी अॅलोपॅथी औषधांना जबाबदार धरणाऱ्या जाहिराती पंतजलीने केल्या होत्या. (Patanjali, Baba Ramdev)
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील निवासी डॉक्टरांची संघटना आणि इतर काही डॉक्टरांच्या संघटनेने ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद प्रतिवादी आहेत.
या प्रकरणात न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांनी अंतरिम आदेश दिले. "प्रतिवाद्यांना मी तीन दिवसांतील ट्विट (एक्स पोस्ट) हटवण्याचे आदेश देत आहे. त्यांनी जर आदेश पाळले नाही तर संबंधित सोशल मीडिया कंपनीला या संदर्भात सूचना दिल्या जातील." बार अँड बेंचने ही बातमी दिली आहे.
ही अवमान याचिका आहे. कोव्हिड १९मुळे होत असलेल्या मृत्यूंना अॅलोपॅथी जबाबदार आहे, अॅलोपॅथी डॉक्टरांमुळे हजारो लोकांचे मृत्यू होत आहेत, अॅलोपॅथी डॉक्टर चुकीचे औषधे देऊन नफा कमवत आहेत, अशा काही जाहिराती पतंजलीने केल्या होत्या, असे अवमान याचिकेत म्हटले आहे.
अशा प्रकारच्या जाहिराती करून 'पंतजली' सर्वसामान्य लोकांच्या मनात अॅलोपॅथी औषधे आणि कोव्हिड लस याबद्दल शंका उत्पन्न करत होते, असे या याचिकेत म्हटले आहे. स्वतःच्या कोरोनिल या औषधाचा खप वाढवण्यासाठी या जाहिराती केल्या जात होत्या, असेही या याचिकेत म्हटले आहे.
सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेवर अंतरिम आदेश जारी केले. यामध्ये बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण आणि पंतजली आयुर्वेद यांना या जाहिराती हटवण्याचे आदेश दिले आहेत.