नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: निवडणुकीची मतमोजणी साडेआठ वाजता सुरु होते, मग माध्यम आठ वाजल्यापासूनच निकालाची आकडेवारी कशी दाखवतात? असा सवाल निवडणूक आयोगाने केला. मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माध्यमांच्या एक्झिट पोलवर चिंता व्यक्त केली. ‘एक्झिट पोल’वर माध्यमांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. तसेच ईव्हीएम बिघाडीचे आरोप निवडणूक आयोगाने पुन्हा फेटाळले.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्व माध्यमांनी काँग्रेसला बहुमत दाखवले होते. मात्र, निकालामध्ये माध्यमांचे एक्झिट पोल फोल ठरले. त्यामुळे एक्झिट पोलवर चिंता व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोगानेही यावर चिंता व्यक्त केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, एक्झिट पोलसाठी किती सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षणामध्ये किती लोकांचे मत घेतले जातात, या सर्व गोष्टींकडे माध्यमांनी लक्ष्य दिले पाहिजे. मतमोजणीच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाते. लगेच ५ ते १० मिनिटांमध्ये माध्यमांवर निकालाचे आकडे यायला सुरुवात होते. एवढ्या लवकर आकडे कसे दाखवले जातात? असा सवाल राजीव कुमार यांनी केला. ‘एक्झिट पोल’ला खरे दाखवण्यासाठी ही आकडेवारी दाखवली जाते का? असा सवालही त्यांनी केला.
ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. इस्रायल जर लेबनॉनमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी हिजबुल्ला पेजर हॅक करू शकतो, तर ईव्हीएम हॅक करता येणार नाही का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर राजीव कुमार म्हणाले, पेजर कनेक्टेड असतो. ईव्हीएम नाही, त्यामुळे ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. ईव्हीएमशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. ईव्हीएमबाबत आमच्याकडे आलेल्या सर्व तक्रारींना आम्ही उत्तर देऊ आणि त्या प्रसिद्धही करू, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. ईव्हीएममध्ये बॅटरी टाकल्यावर त्यावर एजंटची सहीही असते. मतदानाच्या ५ ते ६ दिवस आधी चिन्ह लावली जातात. मशीन तसेच बॅटरीवरही एजंटची सही असते आणि ती सील केलेली असते, असे राजीव कुमार यांनी सांगितले.