

नवी दिल्ली : कोरोनाच्या विनाशकारी साथीने जग हादरवून सोडले होते. त्यानंतर एचएमपीव्ही या नव्या विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे समोर आल्याने अनेक देश काहीसे चिंतेत पडले आहेत. चीनचे शेजारी देश या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भारताच्या आरोग्य महासंचालकांनी यासंदर्भात सध्या काळजी करण्यासारखे नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात सरकारने खबरदारीसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.
चीनमध्ये धुमाकुळ घालत असलेल्या एचएमपीव्ही विषाणूची भारतात १० प्रकरणे नोंदवली गेली. १० पैकी ८ प्रकरणे एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळली आहेत. एचएमपीव्ही हा श्वसनाशी संबंधित रोग असून याची लक्षणे सामान्य सर्दी किंवा फ्लू सारखीच आहेत. लहान मुलांना याचा सर्वाधित त्रास होऊ शकतो. भारत सरकार याबाबत सतर्क झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
याबद्दल बोलताना एम्समधील बालरोग तज्ञ डॉ. नंदकिशोर जोशी म्हणाले की, श्वसनाशी संबंधित हा आजार आहे. नेदरलँड्समधील शास्त्रज्ञांनी २००१ मध्ये याची ओळख पटवली होती. जगभरातील आकडेवारी पाहिली तर एचएमपीव्ही विषाणूची सर्वाधिक प्रकरणे लहान मुलांमध्ये (१ वर्षाखालील) दिसून आली आहेत. लहान मुलांसह वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांनाही याचा संसर्ग होऊ शकतो. कमी रोगप्रतिकारक शक्ती यासाठी जास्त कारणीभूत ठरते. लहान मुलांना श्वसनाचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
डॉ. नंदकिशोर जोशी म्हणाले की, सर्दी, खोकला, ताप येणे, गळ्यात खवखव वाटणे, श्वसनाला त्रास होणे ही एचएमपीव्हीची लक्षणे आहेत. मात्र यासाठीही कुठली विशेष औषधी नाही. सामान्य सर्दीला दिली जाणारी औषधेच दिली जातात आणि आरामाचा सल्ला दिला जातो.
लहान मुलांसह सर्वांनी सर्दी, खोकला असलेल्या लोकांपासून थोडे अंतर राखणे, घरी लहान मुलांची झोपण्याची जागा स्वच्छ ठेवणे कायम हाताची स्वच्छता ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, जवळून संपर्क टाळणे, शक्यतो मास्क वापरणे या गोष्टी केल्या पाहिजेत. या विषाणूची लागण झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र काळजी घेतली पाहिजे. लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. साधारणपणे थंडीच्या काळात श्वसनाशी संबंधित आजाराच्या समस्या उद्भवत असतात. त्यामुळे फार काळजी घेण्याची गरज नाही मात्र सतर्क राहिले पाहीजे, असेही डॉ. नंदकिशोर जोशी म्हणाले.
एचएमपीव्हीच्या चाचणीसाठी नाकातून किंवा घशातून नमुने घेतले जातात. नमुन्यासाठी सॉफ्ट टिप्ड स्टिक (स्वॅब) वापरू शकतात. कोरोना काळातही स्वॅबद्वारे नमुने घेतले जात होते.
- खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड किंवा नाक रुमालाने झाकून ठेवा.
- वारंवार हात स्वच्छ धुवा.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीपासून दूर राहा.
- पौष्टिक आहार घ्या
- हस्तांदोलन आणि खुप जवळून संपर्क टाळा
- सर्दी, खोकला असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळा
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा
दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील बालरुग्ण विभागाचे डॉ. सुरेश गुप्ता एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, हा काही नवा विषाणू नाही. "याबाबत २० वर्षांपासून माहिती उपलब्ध आहे. हिवाळ्यात याच्या संसर्गाची प्रकरणे समोर येतात. हा फ्लूसारखा विषाणू आहे.
याबद्दल बोलताना प्रख्यात हृदयरोग तज्ञ आणि कोरोना काळात दिल्लीचे नोडल अधिकारी असलेले डॉ. अजित जैन म्हणाले की, एचएमपीव्ही व्हायरसचा आताचा स्ट्रेन गंभीर नाही. त्यामुळे आत्तापर्यंत तरी याचे स्वरूप गंभीर होऊ शकत नाही. पुढच्या काळात स्ट्रेनमध्ये नवे काही आले तर त्यावर नंतर बोलता येईल. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडरचा वापर रुग्णांसाठी करण्यात आला. एचएमपीव्हीमध्ये मात्र तशी शक्यता आता तरी दिसत नाही. अगदीच अपवादात्मक परिस्थितीत न्यूमोनिया गंभीर स्वरूपात एखाद्याला असल्यास ऑक्सिजनची गरज पडू शकते. मात्र सामान्य रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासणार नाही. तसेच कोरोना विषाणू नव्याने निर्माण झाला होता. मात्र एचएमपीव्ही हा विषाणू आधीपासून अस्तित्वात आहे. कदाचित यापूर्वीही लोकांना त्याचा संसर्ग झाला असेल मात्र कोरोना नंतर आपण अनेक गोष्टींबद्दल सतर्क झालो आहोत, असेही डॉ. जैन म्हणाले.