

हिसार : पुढारी वृत्तसेवा
हियाणाच्या हिसार जिल्ह्यात दाट धुक्यामुळे भीषण रस्ते अपघात झाला आहे. उकलाना-सुरेवाला चौकात आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या अपघातात चार लोकांचा जागीच मृत्यू झाला. अनेक लोक अजुनही वाहनाखाली दबले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातानंतर गावात गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या विषयी अधिक माहिती अशी की, हिसारच्या उकलाना मध्ये सुरेवाला चौकात सकाळी दाट धुक्यामुळे एक मोठा अपघात झाला. चंदीगढ राष्ट्रीय महामार्गावर धुक्यामुळे कार दुभाजकाला धडकून पलटी झाली. ज्यामध्ये रस्त्यावर मोठे ट्रॅफिक जॅम झाले. यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. या दरम्यान पाठीमागुन वेगात येणारी दुसरी कारही अनियंत्रित होउन त्याच कारला धडकली. या कारच्या पाठिमागून येणारा ट्रक चालकाने समोरील अपघात पाहून ट्रकवर ताबा मिळवण्यासाठी ब्रेक लावला. यात तो पलटी झाला. या अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला.
या अपघातात काही लोक ट्रकच्या खाली दबले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दुभाजकाला धडकणारी कार नरवानाहून येत असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.