

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : उत्तर भारतात मान्सूनच्या पावसाने रौद्ररूप धारण केले असून, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असले, तरी पावसाचा जोर कायम असल्याने चिंता वाढली आहे.
हिमाचल प्रदेशात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सिमला जिल्ह्यातील कोटखाई, जुब्बल आणि जुन्गा येथे रात्री उशिरा झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. खबरदारी म्हणून कुल्लू-मनालीसह 10 जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर केली. चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गासह 5 प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि सुमारे 800 लहान-मोठे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहेत.
पंजाबमध्ये परिस्थिती बिकट असून, राज्यातील 11 जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. फाजिल्का, फिरोजपूर, कपूरथला, पठाणकोट, तरनतारन आणि बरनाला या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला. शासकीय आकडेवारीनुसार, पंजाबमधील सुमारे 1,312 गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. जालंधर आणि लुधियानाच्या अनेक भागांमध्ये रस्त्यांवर आणि घरांमध्ये 4 फुटांपर्यंत पाणी साचले आहे. अमृतसरच्या घोनेवाला येथे धुस्सी धरण फुटल्याने आजूबाजूचा सुमारे 15 किलोमीटरचा परिसर पाण्याखाली गेला आहे.
हरियाणातील यमुनानगर, सिरसा, पंचकुलासह 6 जिल्ह्यांमध्ये पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदीवरील हथिनीकुंड बॅरेजमध्ये रात्री 2 वाजता पाण्याची आवक 1 लाख 5 हजार क्युसेकवर पोहोचल्याने सर्व दरवाजे उघडावे लागले. सोमवारी सकाळी 9 वाजता पाण्याची पातळी 3 लाख 29 हजार क्युसेकवर पोहोचली होती. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे 12 घरांचे मोठे नुकसान झाले आहे.