

कोलकाता; वृत्तसंस्था : कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी राजकीय सल्लागार संस्था आयपॅकवरील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) छाप्याविरोधात तृणमूल काँग्रेसने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने असा आरोप केला होता की, तपास यंत्रणेने पक्षाचा अत्यंत गोपनीय राजकीय डेटा जप्त केला आहे. हा डेटा सुरक्षित ठेवण्याची आणि त्याला संरक्षण देण्याची मागणी तृणमूलने याचिकेद्वारे केली होती.
ईडीने न्यायालयाला सांगितले की, त्यांनी आयपॅक कार्यालय किंवा त्याचे संचालक प्रतीक जैन यांच्याकडून काहीही जप्त केलेले नाही. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी खंडपीठाला सांगितले की, तपास यंत्रणेने काहीही जप्त केलेले नाही. उलट खुद्द मुख्यमंत्र्यांनीच फाईल्स आणि उपकरणे सोबत नेली आहेत. न्यायमूर्ती घोष यांच्या खंडपीठाने नमूद केले की, 8 जानेवारी रोजी आयपॅक किंवा त्यांच्या संचालकांकडून कोणतीही जप्ती झालेली नाही. ईडीच्या या विधानानंतर आता या प्रकरणात हाताळण्यासारखे काहीही उरलेले नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने तृणमूलची याचिका निकाली काढली.
ईडीने या विषयावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने या प्रकरणाची सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली. तृणमूलच्या वतीने वकील मेनका गुरुस्वामी यांनी पक्षाच्या डेटाला संरक्षण देण्याची मागणी लावून धरली.