

डेहराडून; वृत्तसंस्था : उत्तराखंडमध्ये शुक्रवारी पहाटे मुसळधार पाऊस आणि ढगफुटीने मोठे संकट ओढवले आहे. चमोली, रुद्रप्रयाग आणि टिहरी जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी झालेल्या भीषण भूस्खलनामुळे घरे कोसळली असून, अनेक जण ढिगार्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत पती-पत्नीसह तीन जण बेपत्ता झाले असून, 30 हून अधिक पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असले, तरी सततच्या पावसामुळे त्यात मोठे अडथळे येत आहेत.
चमोली जिल्ह्यातील देवाल तहसीलच्या मोपाटा गावात भूस्खलनामुळे एक घर आणि गोठा पूर्णपणे ढिगार्याखाली गाडला गेला. चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत तारा सिंह आणि त्यांची पत्नी बेपत्ता झाले आहेत. याशिवाय विक्रम सिंह नावाचे एक रहिवासी जखमी झाले असून त्यांच्या घरावरही दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत सुमारे 20 जनावरेही ढिगार्याखाली अडकली आहेत. घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. सततच्या पावसामुळे चमोली जिल्ह्यातील सर्व विकास ब्लॉक्समध्ये शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
‘देवभूमी’ म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड राज्य आज एका अभूतपूर्व आपत्कालीन संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. डेहराडून येथील ‘सोशल डेव्हलपमेंट फॉर कम्युनिटीज’ (एसडीसी) फाऊंडेशनने सादर केलेल्या ‘उत्तराखंड डिझास्टर अँड अॅक्सिडेंट अॅनालिसिस इनिशिएटिव्ह’च्या (यूडीएएआय) ताज्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अहवाल राज्यातील वाढत्या नैसर्गिक आपत्ती, ढासळणार्या पायाभूत सुविधा आणि मानवी चुकांमुळे होणार्या दुर्घटनांचे गंभीर चित्र मांडतो.