

अहमदाबाद; वृत्तसंस्था : गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गुजरातसह अहमदाबाद, वडोदरा आणि नर्मदा जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला असून रस्ते, घरे, सार्वजनिक सुविधा आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. वलसाड, सुरत आणि नवसारी या तीन जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
पुरामुळे अनेक गावे आणि शहरे पाण्याखाली गेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यभर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाची बचाव पथके तैनात करण्यात आली असून सखल भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. सुरत, वलसाड आणि नवसारी जिल्ह्यांमध्ये नद्या आणि खाड्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. अतिवृष्टीमुळे औरंगा, पार आणि दमनगंगा नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या अनेक सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. अहमदाबादमधील पूरस्थिती लक्षात घेऊन शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. वडोदरा, नर्मदा जिल्ह्यात पूरस्थिती आहे.
रेल्वेगाड्या रद्द
अतिवृष्टीमुळे अहमदाबाद-मुंबई रेल्वेमार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून नवसारी रेल्वे स्थानकावर शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत.
मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी सुरत, वलसाड आणि नवसारीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. तसेच पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मंत्री आणि आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. प्रशासनाने सतर्क राहून प्रत्येक प्रभावित भागात तातडीने मदत आणि बचावकार्य पोहोचवावे, असे निर्देश दिले.
महामार्गावर वाहनांच्या रांगा
वलसाडमधील अनेक निवासी आणि व्यापारी भाग जलमय झाले असून रस्त्यांवर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरही पुराचे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
५० हून अधिक कार पाण्याखाली
वलसाडमधील वापी शहरातील निवासी परिसरात उभ्या असलेल्या ५० हून अधिक कार पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. औरंगा, पार आणि दमनगंगा नद्यांना पूर आला असून, अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. परिस्थिती गंभीर होताच प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू केले आहे.
महाराष्ट्राकडे येणारी बस पुरात अडकली
वलसाड जिल्ह्यात सुरुतहून महाराष्ट्राकडे चाललेली एक खासगी बस पुरात अडकली. या बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी असून, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश आहे. बसभोवती पाण्याची पातळी वाढत असून, बस चारही बाजूंनी वेढली गेली आहे. वेगवान प्रवाहामुळे प्रवाशांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागू शकतेे.
पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट
वलसाड, नवसारी, डांग, सुरत आणि तापी या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१६ तासांत विक्रमी ११०० मि.मी. पाऊस
राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्राच्या माहितीनुसार, वलसाड जिल्ह्यातील उमरगाव तालुक्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या १६ तासांत तब्बल ११०० मि.मी. पावसाची नोंद झाली. हा यंदाच्या मान्सूनमधील अत्यंत विक्रमी पाऊस मानला जात आहे.