

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातून मान्सूनने मंगळवारी अधिकृतपणे निरोप घेतला असला तरी, पावसाचा जोर मात्र कायम आहे. राजस्थानमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस झाला. जयपूर, सीकरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. जयपूरमध्ये तर अवघ्या 2 तासांच्या पावसाने रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. जयपूरच्या अनेक भागांमध्ये 2 ते 3 फूट पाणी साचले. दसर्यानिमित्त रावण दहनासाठी तयार केलेले पुतळेही पाण्यात वाहून जाताना दिसले. कोटामध्ये तर 221 फूट उंच असलेला रावणाचा पुतळा पावसामुळे भिजला. हा जगातील सर्वात उंच रावणाचा पुतळा असल्याचा दावा केला जात आहे. हवामान विभागाने राजस्थानात दसर्याच्या दिवशी, म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देशात मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली. भारतात या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी 868.6 मि.मी. पाऊस पडतो, तर यावर्षी 937.2 मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत हवामानाशी संबंधित घटनांमध्ये देशभरात 1520 लोकांचा मृत्यू झाला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा हा जोर ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा 15 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्येही मान्सूनोत्तर काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो.