

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये पावसाने पुन्हा रौद्ररूप दाखवले. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत 14 जण बेपत्ता झाले आहेत, तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि पुरामुळे आतापर्यंत 424 लोकांना जीव गमवावा लागला. दोन्ही राज्यांमध्ये बचावकार्य वेगाने सुरू असले, तरी सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
चमोली जिल्ह्यातील नंदनगर परिसरात शुक्रवारी रात्री ढगफुटी झाली. या घटनेनंतर निर्माण झालेल्या चिखल आणि मातीच्या ढिगार्याखाली अनेक जण दबले गेले, तर 14 जण बेपत्ता झाले. या दुर्घटनेमुळे सुमारे 200 लोकांना फटका बसला असून, 35 हून अधिक घरांचे नुकसान झाले. घटनेच्या सुमारे 16 तासांनंतर, बचाव पथकाला ढिगार्याखालून एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात यश आले. दुसरीकडे, डेहराडून-मसुरी रस्त्याचे नुकसान झाले आहे. मात्र, मसुरीमध्ये अडकलेले सुमारे 2 हजार पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली. सिमला शहराची जीवनवाहिनी मानला जाणारा सर्कुलर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात सोनभद्र जिल्ह्यातील रिहंद धरण यावर्षी पाचव्यांदा ओव्हर फ्लो झाले आहे, तर कौशांबीमध्ये वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशात राज्यात सरासरी 1097.28 मि.मी. पावसाची नोंद झाली, जी सामान्य पावसापेक्षा 187.96 मि.मी. जास्त आहे. गुना जिल्ह्यात सर्वाधिक 1651 मि.मी. पाऊस झाला, तर खरगोनमध्ये सर्वात कमी 665.48 मि.मी. पावसाची नोंद झाली.