

लखनौ; वृत्तसंस्था : भर उन्हाळ्यात दुपारी ‘लॉकडाऊन’सद़ृश स्थिती निर्माण होणे नवे नाही; पण सकाळी 10 वाजताच अख्खे शहर ओस पडत असेल, तर उष्णतेच्या दाहकतेची कल्पना न केलेलीच बरी! राजस्थानच्या चुरू आणि जैसलमेरला मागे टाकत उत्तर प्रदेशातील बांदा जिल्हा आता देशातील नवे ‘हीट आयलंड’ ठरला आहे. मे महिन्याच्या मध्यातच येथील तापमान तब्बल 48.2 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने उष्माघाताच्या भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. सकाळी 10 नंतर बाजारपेठांत शुकशुकाट पसरत असून, अघोषित ‘लॉकडाऊन’ स्थिती निर्माण होत आहे.
उष्णतेमुळे बांदा जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर आणि व्यावसायिक सकाळी 6 वाजल्यापासूनच कामाला लागत असून, सकाळी 9 वाजताच आपला गाशा गुंडाळून घरी परतत आहेत. तीव्र उन्हामुळे शेतकरी आता दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी एलईडी फ्लडलाईटस् लावून शेतात काम करत आहेत. दुपारच्या वेळेत काम करणे अशक्य असल्याने मजुरांना त्यांच्या हक्काच्या 40 टक्के मजुरीवर पाणी सोडावे लागत आहे. इतकेच नाही, तर वाढत्या लोडशेडिंग आणि उष्णतेमुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून वीज विभागाचे कर्मचारी तब्बल 44 सब स्टेशन्समधील 1,300 हून अधिक ट्रान्स्फॉर्मर्सवर सतत पाण्याचा मारा करून ते थंड ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
20 वर्षांत वाळवंट होण्याचा धोका
डोंगरांनंतर बांदा येथील जीवनवाहिनी असलेल्या केन आणि इतर लहान नद्यांनाही वाळू माफियांनी ओरबाडले आहे. नियमांचे उल्लंघन करून केन नदीतून दररोज तब्बल 55 हजार टन लाल वाळू बेकायदेशीरपणे काढली जात आहे. वाळू संपल्यामुळे नद्यांमधील खडक उघडे पडले आहेत. ज्यामुळे पाण्याची पातळी खालावली असून, विहिरी आणि बोअरवेल उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरड्या पडत आहेत. संशोधकांनी धोक्याचा इशारा दिला आहे की, जर हे बेकायदेशीर खाणकाम आणि जंगलतोड अशीच सुरू राहिली, तर पुढील दोन दशकांत बांदा जिल्हा राहण्याअयोग्य आणि वाळवंट बनेल.
बांदा अचानक का तापला?
एका संशोधन अहवालानुसार, गेल्या काही दशकांत बांदा जिल्ह्याने आपल्या घनदाट वनक्षेत्राचा सुमारे 16 टक्के भाग गमावला आहे. विंध्य पर्वतरांगांमधील तब्बल 25 टक्के डोंगर बेकायदेशीर उत्खनन आणि प्रचंड स्फोटांमुळे नष्ट झाले आहेत. येथील डोंगर हे पाणी शोषून भूजल पातळी वाढवण्याचे काम करायचे; मात्र खाणकामामुळे ही नैसर्गिक रचनाच उद्ध्वस्त झाली आहे.