– अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन डेस्क
'अंडरवर्ल्ड' म्हंटलं तर, कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिम आणि त्याचा गाॅडफादर मिर्जा हाजी मस्तान आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, हे दोघेही आपल्या सुरुवातीच्या काळात एका बाईच्या इशाऱ्यावर नाचत होते. त्या बाईचं नाव आहे की, जेनाबाई दारुवाली. या बाईच्या जगण्याचा प्रवास अंडरवर्ल्डमध्ये आतापर्यंत होऊन गेलेल्या व्यक्तींच्या आयुष्यापेक्षा वेगळाच आहे. जेनाबाई १९२० मध्ये स्वातंत्र्य चळवळीत सामील होती, हिंदु-मुस्लिमांना एकत्र करण्यासाठी धडपडत होती, तर स्वातंत्र्यानंतर नवरा पोराबाळांना सोडून पाकिस्तानात निघून गेला म्हणून पोरांना जगविण्यासाठी सुरुवातीला तांदळाचा काळाबाजार करू लागली आणि नंतर दारूच्या व्यवसायात माफिया क्विन बनली. जाणून घेऊ या… तिचा इंटरेस्टिंग प्रवास.
स्वातंत्र्याच्या लढाईतील जेनाबाईचा सहभाग
६०-७० दशकात अंडरवर्ल्डचं रिपोर्टिंग करणारे पत्रकार हुसैन जैदी याचं 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' जेनाबाईच्या जीवनाबद्दल माहिती देतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार १९२० च्या सुरुवातीला एका मुस्लीम घरात मेमन हलाई यांच्या घरात जन्माला आलेल्या जेनाबाईला सहा भावडं होती. मुंबईच्या प्रसिद्ध अशा डोंगरीच्या झोपडपट्टीत एका चाळीत ती राहत होती. असं सांगितलं जातं की, १९३० च्या दशकात डोंगरी भागात महात्मा गांधी सुरू केलेल्या स्वातंत्र्य लढ्यात जेनाबाई सामील झाली होती. १४ वर्षी तिचं लग्न झालेलं होतं. लग्नानंतरही तिने स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन आपलं थोडफार योगदान देणं सुरूच ठेवलं. एखाद्या हिंदु व्यक्तीला वाचवलं म्हणून नवऱ्याकडून जेनाबाईला जबर मारहाण होत होती. १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली आहे. त्यामध्ये आपल्या पतीबरोबर पाकिस्तानात जाण्यास तिने विरोध केला. त्यामुळे तिचा पती तिला व पाच मुलांना सोडून पाकिस्तानला गेला.
तस्करीच्या धंद्यात जेनाबाई कशी शिरली?
देश स्वतंत्र झाला. पण, देशात अन्नधान्यासाठी नागरिकांची परवड सुरू झाली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने स्वस्त दरात रेशन देण्यास सुरू केलं. आपलं आणि आपल्या ५ मुलांचं पोट चालविण्यासाठी जेनाबाई तांदूळ विकण्याच्या धंद्यात सुरू शिरली. इथूनच जेनाबाईने तांदळाची तस्करी करण्यास सुरूवात केली. पण, त्यात तिला नुकसान झाले. त्यानंतर दारूच्या धंद्यात जेनाबाईने प्रवेश केला. डोंगरीच्या झोपडपट्टीमध्ये दारूचा धंदा सुरू केला. दारू तयार करणे आणि ती विकणे, हा जेनाबाईचा व्यवसाय झाला. दारूच्या व्यवसायात जेनाबाईचं नाणं खणखणीत होतं. तिचा हा धंदा इतका पसरला की, शेवटी जेनाबाई अडनाव 'दारुवाला' असं झालं.
पोलिसांच्या तावडीत सापडली अन् पोलिसांचीच खबरी झाली
आता दारूचा धंदा करायचा तर, पोलिसांशी काॅन्टॅक्ट तर दांडगे असायला हवे. जेनाबाईने पोलिसांसोबत चांगले संबंध होते. परंतु, तिचा दारूचा वाढता पसारा पाहता १९६२ मध्ये तिच्या दारूच्या भट्टीवर छापा टाकत प्रत्यक्ष बेकायदेशीररित्या दारू विकताना जेनाबाईला पकडलं. त्यानंतर जगासमोर बनवाट दारू विक्री होत असल्याचा कारभार जगासमोर आला. परंतु, असं सांगितलं जातं की, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत जेनाबाईचे पोहोच होती. म्हणून पोलिसांची खबरी होण्याच्या अटीवर जेनाबाई तुरुंगमुक्त करण्यात आले. ती पोलिसांना तस्कारी करणाऱ्यांची माहिती देत असे आणि पोलिस त्या ठिकाणी जाऊन छापा टाकत असतं. त्यातील १० टक्के हिस्सा जेनाबाईला मिळत असे.
जेनाबाई, दाऊद इब्राहिम आणि हाजी मस्तान
२० वर्षांचा असताना दाऊद पहिल्यांदा जेनाबाईशी भेटला होता. कारण, दाऊदच्या वडिलांशी जेनाबाईची चांगली ओळख होती. तिचं दाऊदच्या घरी येणं-जाणं होतं. त्यानंतर दाऊदचा गाॅडफादर असणारा मिर्जा हाजी मस्तान हा जेनाबाईला बहीण मानायचा. तो जेव्हा-केव्हा अडचणीत येत असे तेव्हा जेनाबाईचा सल्ला घेण्यासाठी येत असे. आता आपला गुरू जेनाबाईचा सल्ला घेतो आहे म्हंटल्यानंतर दाऊदही जेनाबाईचा सल्ला घेऊ लागला.
९० च्या दशकात कित्येक बेकायदेशीर कामांचं आगार म्हणजे डोंगरी, अशी या भागाची किर्ती होती. खून, मारामाऱ्या, गोळीबार, खुलेआम कत्तली, हत्या, तस्कारी आणि बरंच काही… या सर्व घटना डोंगरीच्या झोपडपट्टीत घडत होत्या. इथं तस्करी हा मोठा धंदा होता आणि याच काळात मुंबईत दाऊतची दहशत निर्माण होत होती. दरम्यान, २० दशकातील जेनाबाई आता वयस्क होऊ लागली. त्यामुळे तिच्या सल्ल्यावर काम करणारा दाऊददेखील जेनाबाईपासून वेगळा होऊ लागला.
… असा झाला जेनाबाईचा शेवट
जेनाबाईचा थोरला मुलगादेखील काळ्या धंद्यात आपलं नशिब आजमवू लागला. परंतु, एका गॅंगवाॅरमध्ये त्याची गोळी मारून हत्या केली. आयुष्य अंडरवर्ल्डमध्ये काढल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जेनाबाईने सर्व सोडून धार्मिक रस्त्याने चालू लागली. ती धार्मिक वृत्तीची झाल्यामुळे थोडी मवाळ झाली. त्यामुळेच तिने आपल्या मुलाला मारलेल्यांची माहिती मिळूनदेखील हत्या करणाऱ्यांना सोडून दिले. शेवटी वय वाढल्यामुळे जेनाबाईची दहशतसुद्धा कमी होत गेली. नंतर हाजी मस्तान आणि दाऊददेखील तिच्यापासून वेगळे झाले. जेनाबाईला ओळखणारे लोक असं सांगतात की, १९९३ मुंबईत जे बाॅम्बस्फोट झाले त्याचा आघात जेनाबाईच्या मनावर मोठा झाला. त्यातच ती आजारी पडली आणि काही वर्षांनंतर तिने जगाचा निरोप घेतला.