

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पाकिस्तानातील ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने भारतावर हल्ला करण्याचा कट रचल्याचे उघड झाले असून, त्यासाठी त्याने बांगला देशमध्ये नवीन दहशतवादी तळ उभारले आहेत. या घडामोडींमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्याकरिता बांगला देशातून होणार्या संभाव्य घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे.
30 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील खैरपूर तामेवाली येथे झालेल्या एका सभेतील व्हिडीओवरून हा खुलासा झाला आहे. या सभेत ‘लष्कर-ए-तोयबा’चा कमांडर सैफुल्लाह सैफ याने म्हटले होते की, हाफिज सईद शांत बसलेला नसून, तो बांगला देशमार्गे भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. त्यावेळी बांगला देशातील दहशतवादी तळावरून हाफिज सईद भारतावर हल्ला करणार होता, असेही त्याने म्हटल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हिडीओनुसार, सईद हा बांगला देशमधील तरुणांना ‘जिहाद’च्या नावाखाली भारताविरोधात चिथावत आहे.
अमेरिका आमच्यासोबत
आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बदल झाल्याचा दावा करत सैफने, अमेरिका आमच्यासोबत असल्याचा आणि बांगला देश व पाकिस्तानमधील मैत्री वाढल्याचा दावाही केला आहे. विशेष म्हणजे, या सभेला लहान मुलेही उपस्थित होती. दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ भारताविरुद्ध जिहाद करण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलांनाही चिथावत असल्याचे स्पष्ट होत आहे.