

Gyanesh Kumar Controversy: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी पद्धतीनं कारभार केला अन् इतर दोन निवडणूक आयुक्तांनी विरोध करूनही काही निर्णय त्यांच्या संमतीशिवाय घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर ज्ञानेश कुमार यांच्याविरूद्ध टीका होत असून कॉकरोज जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपकेने ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागितला असून त्यासाठी ४८ तासाचा अल्टीमेट देण्यात आला आहे. जर राजीनामा झाला नाही तर देशभरात आंदोलन कुरू करण्याचा इशारा देखील त्याने दिला आहे.
गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिपकेने काही भारतीय जनता पक्षाचे नेते हरण्यास देखील ज्ञानेश कुमारच जबाबदार असल्याचा आरोप केला. मात्र दिपकेने यावेळी कोणते भाजप नेते ज्ञानेश कुमारांमुळे निवडणूक हरले हे मात्र सांगितलं नाही. इंडियन एक्सप्रेसच्या शोध रिपोर्टनंतर विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर टीका केली आहे.
अभिजीत दिपकेला विचारण्यात आलं की विरोधकांनी देखील निवडणूक लढवण्यास नकार द्यायला पाहिजे का? त्यावर बोलताना अभिजीत दिपके म्हणाला, 'मी तर असं म्हणतो की जर मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक होत नसेल तर त्यांनी निवडणूक न लढवणेच योग्य आहे. भाजपचे नेते देखील निवडणूक हरले आहेत. त्यांना देखील मी सांगू इच्छितो की सर तुम्ही जिंकू शकला असता मात्र तुम्हाला ज्ञानेश कुमार यांनी हरवलं आहे.'
पत्रकार परिषदेवेळी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर देखील सीजेपी नेत्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांना अखिलेश यादव तुमचे म्हणणे ऐकून निवडणुकीपासून दूर राहणार का? दीपके यांनी यावर उत्तर देताना सांगितलं की ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी ऐकाव ज्यांना नाही ऐकायचं त्यांनी ऐकू नये. हा त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे.
कॉकरोज जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांना ४८ तासाचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी जर ४८ तासात राजीनामा दिला नाही तर आमच्याकडे आंदोलनाचा प्लॅन तयार आहे असे अभिजीत दिपकेने सांगितलं. सीजेपी राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करणार असा इशारा दिला आहे.
दिपके म्हणाला की, 'आम्ही प्रत्येक राज्यात जाऊ. आम्ही प्रत्येक शहरात जाणार आणि लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करणार. आम्ही जंतर मंतरवर आंदोलन करण्यापूर्वी देशभरात गेलो होते तसं आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या विरूद्ध देखील देशभरात मोहीम उघडणार.'