Monsoon Update | गुजरात, केरळमध्ये मुसळधार; आसाममधील मृतांचा आकडा ८२

केरळममध्ये भूस्खलन, ७ मृत्यू
अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी येथे शनिवारी (दि. १ ऑगस्ट ) झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात स्थानिक नागरिक दोरखंडाच्या साहाय्याने पुराच्‍या पाण्यातून बाहेर काढण्‍यासाठी मदतकार्य करताना बचाव पथके.
अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी येथे शनिवारी (दि. १ ऑगस्ट ) झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात स्थानिक नागरिक दोरखंडाच्या साहाय्याने पुराच्‍या पाण्यातून बाहेर काढण्‍यासाठी मदतकार्य करताना बचाव पथके. (फोटो : पीटीआय)
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरतमध्ये सर्वाधिक २४ इंच पाऊस नोंदवला गेला, तर इतर १२ क्षेत्रांमध्ये १० इंचांपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला. हवामान विभागाने गुजरात आणि केरळम राज्याच्या अनेक जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

दरम्यान, आसाममध्ये पुरामुळे गेल्या २४ तासांत आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पूरबळींची संख्या ८२ वर पोहोचली आहे. केरळममध्येही सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूर आणि भूस्खलन होऊन दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. इडुक्की आणि कोट्टायम जिल्ह्यांत दरडी कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये सात लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती वर्तवली जात आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद असून, त्यामुळे जम्मूवरून निघणारी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

किश्तवाडमध्ये ढगफुटी

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील छत्रू भागात ढगफुटी झाली. काही व्यावसायिक आस्थापना आणि दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी पहाटे ३.३० वाजता घडली. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांनी सांगितले की, तातडीने यंत्रणांना घटनास्थळी पाठवण्यात आले असून, प्रभावित भागातून ढिगारे व चिखल बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

आसामात पूरसंकट कायम

आसाममधील पूरस्थिती हळूहळू सुधारत असली, तरी संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. गेल्या २४ तासांत शिवसागर जिल्ह्यात आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे यंदाच्या पुरामुळे मृतांची संख्या वाढून ८० झाली आहे. यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्याच्या आठ जिल्ह्यांतील २,१२,४00 लोक अद्यापही पुरामुळे प्रभावित आहेत आणि ४३७ गावे पाण्याखाली आहेत.

चराईदेव जिल्ह्यात सर्वात जास्त परिणाम झाला असून, सुमारे ८० हजार लोक प्रभावित आहेत. शिवसागरमध्ये सुमारे ७१ हजार लोक प्रभावित झाले आहेत. चार जिल्ह्यांमध्ये ११२ निवारा छावण्या आणि मदत वितरण केंद्रे चालवली जात आहेत, जिथे ७५,५८३ विस्थापित लोकांनी आश्रय घेतला आहे.

दिल्लीत इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये वाढ

मान्सूनचा पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे दिल्ली-एनसीआरमध्ये इन्फ्लूएंझाचे रुग्ण वाढले आहेत. एम्स, दिल्लीच्या वैद्यकीय विभागाचे प्रा. डॉ. संजीव सिन्हा यांनी सांगितले की, मान्सूनमध्ये तापमान कमी होते आणि तापमानातील बदलामुळे इन्फ्लूएंझा विषाणू वेगाने पसरतो. रुग्णांना घसा खवखवणे, नाक वाहणे, कोरडा खोकला आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या जाणवत आहेत.

विविध राज्यांसाठी हवामानाचा इशारा

ऑरेंज अलर्ट : पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र,

गोवा आणि कर्नाटक

यलो अलर्ट : पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली आणि बिहारसह १२ राज्यांत 'यलो अलर्ट'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news