

नवी दिल्ली : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत, राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते याप्रसंगी गुढी उभारण्यात आली.
राजधानी दिल्लीतील जुन्या महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांनी गुढी उभारली. त्यानंतर नवीन महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गुढी उभारण्यात आली. यावेळी प्रशासकीय अधिकारी सुमनचंद्रा, अन्य वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र सदनाच्या सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांसह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी नुतन वर्षाच्या शुभेच्छा देताना निवासी आयुक्त आर. विमला यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत गुढीपाडव्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व यावेळी विशद केले. "गुढीपाडवा हा नवउत्साह, समृद्धी आणि सकारात्मकतेचा सण आहे. महाराष्ट्राबाहेरही तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, ही अभिमानास्पद गोष्ट आहे," असे म्हणत त्यांनी उपस्थितांसह सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हे नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धीचे आणि आनंददायी जावो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.