

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वर्ल्ड फूड इंडिया 2025’ या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, भारत नावीन्य आणि सुधारणांच्या नव्या मार्गावर प्रगती करत आहे. पुढील पिढीतील जीएसटी सुधारणांवर व्यापक चर्चा सुरू असून या सुधारणांमुळे शेतकर्यांचा खर्च कमी होईल आणि त्यांना अधिक परतावा मिळेल.
पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, आता बटर (लोणी) आणि तूप यावर फक्त 5 टक्के जीएसटी लागतो, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच दुधाच्या कॅनवरही केवळ 5 टक्के कर असून यामुळे शेतकरी आणि उत्पादक दोघांनाही चांगले दर मिळतील. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या ‘विविधता, मागणी आणि प्रमाण’ या तिहेरी शक्तीवर जोर दिला. भारत प्रत्येक प्रकारचे धान्य, फळ आणि भाजीपाला उत्पादित करतो. त्यामुळे जागतिक स्तरावर त्याला एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
मोदी यांनी स्पष्ट केले की, भारत जागतिक अन्नसुरक्षेत सक्रिय योगदान देत आहे. शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या अथक परिश्रमामुळे आणि सरकारचे अनुकूल धोरणे यामुळे कृषी क्षेत्राचे सामर्थ्य वाढले आहे.