GST Reforms | जीएसटी सुधारणांमुळे लोकांच्या हातात येणार सुमारे 2 लाख कोटी
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 22 सप्टेंबरपासून लागू होणार्या जीएसटी सुधारणांमुळे लोकांच्या हातात एकूण 2 लाख कोटी रुपये येतील, ज्यामुळे देशांतर्गत वापराला मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
चेन्नईतील कार्यक्रमात त्या म्हणाल्या की, वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) पूर्वीचे चार स्लॅब आता दोन स्लॅबमध्ये सुलभ केल्यामुळे गरीब आणि वंचित, मध्यमवर्गीय कुटुंबे आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना या सुधारणांचा मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा. सुधारित कर रचनेसह जीएसटी सुधारणांचा नवीन संच 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. प्रस्तावित जीएसटी सुधारणांमुळे देशांतर्गत बाजारात उपभोग वाढेल. हे 2 लाख कोटी रुपये सरकार कर म्हणून जमा करत नसून, ते अर्थव्यवस्थेत परत जातात, ज्यामुळे देशांतर्गत वापराला मदत होते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही साबणासारखे उत्पादन मोठ्या प्रमाणात खरेदी करता तेव्हा उत्पादक उत्पादन वाढवतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुधारणेचा फायदा कसा होणार?
याबद्दल अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, दोन स्लॅबच्या रचनेमुळे ग्राहक सामान्यतः खरेदी करत असलेल्या उत्पादनाची किंमत कमी होते.

