नवी दिल्ली : 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेला शक्तिशाली स्फोट हा दहशतवादी हल्लाच होता, असा प्रथमच स्पष्ट उल्लेख सरकारने केला आहे.
तपासात सीमापार संबंधांचे पुरावे आढळले, तर सरकार ‘ऑपरेशन सिंदूर भाग-2’सारखी कारवाई सुरू करू शकते, असे संकेत सरकारने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गृहमंत्र्यांना यासंदर्भात आवश्यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ आणि सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. सोमवारी झालेल्या हल्ल्याचा या बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. हे देशाविरुद्ध घृणास्पद आणि भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. बैठकीच्या सुरुवातीला, मंत्रिमंडळाने दोन मिनिटे मौन पाळून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, हा हल्ला केवळ दिल्लीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या शांतता आणि एकतेवर थेट हल्ला आहे.
बैठकीत एक ठरावही मंजूर करण्यात आला. देशविरोधी शक्तींनी घडवून आणलेली एक भयानक दहशतवादी घटना देशाने पाहिली आहे. हा हल्ला एक अमानवी कृत्य आहे. यामध्ये निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. त्याचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे, असे या ठरावात म्हटले आहे. मंत्रिमंडळाने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आणि जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली. तसेच, मंत्रिमंडळाने आपत्कालीन सेवा, पोलिस आणि वैद्यकीय कर्मचार्यांच्या त्वरित सहकार्याचे आणि धाडसी प्रयत्नांचे कौतुक केले.
दहशतवादाबाबत भारताच्या शून्य सहनशीलता धोरणाशी तडजोड केली जाणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांनी सुरक्षा एजन्सींना तातडीने आणि अत्यंत बारकाईने तपास सुरू करण्याचे निर्देश दिले. भारत दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सहकार्य आणखी मजबूत करेल, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळाने असेही नमूद केले की, अनेक देशांच्या सरकारांनी भारतासोबत एकता आणि सहकार्याचे संदेश पाठवले आहेत. बैठकीत असाही निर्णय घेण्यात आला की, लाल किल्ला स्फोटाची चौकशी राष्ट्रीय सुरक्षा संस्थांच्या संयुक्त पथकाद्वारे केली जाईल आणि पंतप्रधान कार्यालयाकडून त्यावर लक्ष ठेवण्यात येईल. मंत्रिमंडळाने पुनरुच्चार केला की, सरकार प्रत्येक भारतीय नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी वचनबद्ध आहे आणि प्रत्येक दहशतवादी कटाला चोख उत्तर दिले जाईल.
मोठी घटना रोखण्यात तपास यंत्रणांना यश
मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहशतवाद्यांच्या मोठ्या योजनेला हाणून पाडण्यात पोलिस आणि तपास यंत्रणांना मिळालेल्या यशाबद्दलही चर्चा झाली. मंत्रिमंडळाने सर्व राज्यांच्या पोलिसांमधील समन्वयाचे कौतुक केले. हल्लेखोरांना नियोजित योजना राबविण्यात यश आले असते, तर नुकसानीचा अंदाज लावणे कठीण झाले असते. सुरक्षा यंत्रणांनी हा कट हाणून पाडला, असे यावेळी सांगण्यात आले.