नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सरकारी कार्यालयांमध्ये गेल्या ऑक्टोबर महिन्यात राबवण्यात आलेल्या एका महिन्याच्या विशेष स्वच्छता अभियानातून केंद्र सरकारने तब्बल 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. ही रक्कम इतकी मोठी आहे की, यातून 7 वंदे भारत ट्रेन खरेदी केल्या जाऊ शकतात. यासोबतच, या अभियानामुळे सुमारे 233 लाख चौरस फूट जागाही मोकळी झाली आहे, जी मोठ्या प्रकल्पांसाठी वापरली जाऊ शकते.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 2014 पासून सुरू असलेल्या या अभियानामुळे सरकारने भंगार विकून आतापर्यंत एकूण 4,100 कोटी रुपये कमावले आहेत. ही रक्कम एखाद्या मोठ्या अंतराळ मोहिमेच्या किंवा अनेक चांद्रयान मोहिमांच्या एकूण बजेटइतकी आहे. गेल्या पाच वर्षांत अशा मोहिमांमधून एकूण 923 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आहे, ज्यावर एखादा मोठा मॉल किंवा पायाभूत सुविधा प्रकल्प उभारता येईल.