

नवी दिल्ली; पीटीआय : सोने-चांदी, वाहने, कपडे आणि विविध वस्तूंची खरेदी करीत देशभरात दिवाळीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. धनत्रयोदशीला एक लाख कोटी रुपयांहून अधिक उलाढाल अपेक्षित आहे. या उलाढालीत सोने-चांदीचा वाटा तब्बल 60 हजार कोटी रुपयांहून अधिक असेल, असा अंदाज द कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) वर्तविला आहे.
देशात प्रत्येक सणाचे एक वैशिष्ट्य आहे. मात्र दिवाळीतील धनत्रयोदशी त्या सर्वांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असते. या दिवशी सोने-चांदीची खरेदी केली जाते. दिवाळीनंतर लगेचच विवाह हंगाम सुरू होत असतो. त्याची खरेदीही याच मुहूर्तावर केली जाते. घरात एखादी नवीन वस्तू देखील या कालावधीत खरेदी करण्यात येते. त्यामुळे यंदाच्या धनत्रयोदशीलाही सोने, चांदी, भांडी, स्वयंपाकगृहात लागणार्या वस्तू, वाहने, लक्ष्मी (केरसुणी), इलेक्ट्रिक वस्तू, चांदीची लक्ष्मीची आणि गणेशाची प्रतिमा, पणती आणि पूजा साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आल्याची माहिती द कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दिली.
सोने, चांदी आणि इतर वस्तूंच्या खरेदीमुळे धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारपेठेत एक लाख कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. धनत्रयोदशीला तांबे, चांदी आणि स्टीलची भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याची माहिती सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिली.
सीएआयटीच्या ज्वेलरी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा म्हणाल, गेल्या दोन दिवसांत सराफ बाजारपेठेत ग्राहकांची अभूतपूर्व गर्दी दिसून येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार सराफ बाजारात 60 हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे. दिल्लीच्या वायदे बाजारात सोन्याच्या विक्रीने 10 हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. गत वर्षापेक्षा त्यात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
...तरीही सोने-चांदीवर उड्या
गतवर्षी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 80 हजार रुपये होता. आता सोन्याच्या दराने 1 लाख 30 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. सोन्याच्या भावात 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गतवर्षी चांदीचा प्रतिकिलो भाव 98 हजार रुपये होता. चांदीच्या भावाने 1 लाख 80 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. चांदीच्या भावात 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतरही सोने-चांदीत धनत्रयोदशीला काही प्रमाणात का होईना, गुंतवणूक करण्यात आली.