

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ झाली होती. जानेवारीपासून सोने तब्बल 27 टक्क्यांनी महागले आहे. शेअर बाजारापेक्षाही सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. मात्र सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे.
चालू वर्षातील सर्वाधिक परतावा देणार्यांच्या यादीत सोने अग्रक्रमावर आहे. स्थानिक बाजारात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 1 लाख 1 हजार 510 रुपयांवर गेला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 93 हजार 50 रुपयांवर गेला आहे. लग्न समारंभात सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाढत्या दरामुळे 18 आणि त्याहून कमी कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 78 हजार 330 रुपये होता.
जानेवारीच्या सुरुवातीस चांदीचा प्रतिकिलो दर 90 हजार 500 रुपये होता. त्यात आता 1 लाख 21 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तब्बल 30 हजार 500 रुपयांनी चांदी महागली आहे. गेल्या चार दिवसांत चांदीच्या भावात किलोमागे पाच हजार रुपयांनी वाढ झाली आहे. उद्योगांकडून चांदीला वाढती मागणी असल्याने भावात वाढ झाली आहे.