

मुंबई/नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने प्रतितोळा दोन हजारांनी स्वस्त झाले असून, सोन्याला विना-जीएसटी प्रतितोळा 1 लाख 38 हजार रुपये दर मिळाला. बुधवारी (दि. 31) हा दर 1 लाख 40 हजार रुपये होता. गुरुवारी (दि. 1) सोने खरेदी करताना जीएसटी, घडणावळीसह 1 लाख 52 हजार 140 रुपये ग्राहकांना मोजावे लागले. चांदीच्या दरात कुठलीही वाढ आज झाली नाही. चांदीचा दर प्रतिकिलो 2 लाख 43 हजार रुपये होता. तसेच, व्यावसायिक गॅस सिलिंडर 111 रुपयांनी महागला आहे. सलग तीन महिन्यांच्या दरवाढीनंतर विमान इंधनाच्या दरात 7.3 टक्क्यांनी घट झाली आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स 32 अंकांनी खाली आला, तर निफ्टीत 16 अंकांनी वाढ झाली.
गेल्यावर्षी जानेवारीत सोने दर प्रतिदहा ग्रॅमला 1 लाख 3 हजार होता. म्हणजेच वर्षभरात सोने तोळ्यामागे तब्बल 32 हजार रुपयांनी महागले. हेच दर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन हजार रुपये प्रतितोळ्यामागे घसरले. गुरुवारी सराफ बाजारात तेजी नव्हती. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात दररोज वाढ होत राहणार असून, सराफ बाजाराला तेजी वर्षभर कायम राहणार आहे. अर्थात, हे दर स्थानिक पातळीवर वेगवेगळे असू शकतात.
व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,691.50 रुपयांवर गेली आहे. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचालकांना याचा फटका बसून खाद्यान्नाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे (14.2 किलो) दर 853 रुपयांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. दुसरीकडे, विमान इंधनाच्या दरात 7.3 टक्क्यांनी घट झाल्याने विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक दरानुसार तेल कंपन्यांनी विविध इंधनांचे मासिक दर गुरुवारी जाहीर केले. विमान इंधनाच्या दरात प्रतिकिलो लिटर (1 हजार लिटर) मागे 7,353.75 रुपयांनी घट झाली आहे. म्हणजेच विमान इंधनाचे दर 7.3 टक्क्यांनी घटून 92,323.02 रुपये प्रतिकिलो लिटरवर आले आहेत. डिसेंबर महिन्यात विमान इंधनाचे दर एक किलो लिटरमागे 5,133.75 रुपयांनी वाढले होते. विमान कंपन्यांच्या संचलन खर्चात 40 टक्के वाटा इंधनाचा असतो. त्यामुळे विमान कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे.
शेअर निर्देशांकांची सुरुवात नकारात्मक
केंद्र सरकारने तंबाखूजन्य उत्पादनांवर 1 फेब्रुवारीपासून कराची घोषणा केल्याने एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर भावात घसरण झाली. वित्तीय संस्थांचे शेअर भावही कोलमडल्याने नववर्षातील पहिल्याच दिवशी शेअर निर्देशांकांची सुरुवात नकारात्मक राहिली. सेन्सेक्स 32 अंकांनी खाली आला असून, निफ्टी निर्देशांकात 16 अंकांनी वाढ झाली. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 85,188 आणि राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी निर्देशांक 26,146 अंकांवर स्थिरावला.
जीएसटी उत्पन्न 1.75 लाख कोटींवर
वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) डिसेंबर महिन्यात 1 लाख 75 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. डिसेंबर-2024 च्या तुलनेत करसंकलन 6.1 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी दिली. डिसेंबर-2024 मध्ये 1 लाख 64 हजार 556 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. ऑक्टोबरमधील भरघोस वाढीनंतर नोव्हेंबर-2025 महिन्यात जीएसटी संकलन 0.7 टक्क्याने वाढून 1 लाख 70 हजार कोटी रुपयांवर गेले होते. नोव्हेंबर-2024 मध्ये 1 लाख 69 हजार कोटी रुपये जीएसटीपोटी जमा झाले होते. एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीतील करसंकलन 8.6 टक्क्यांनी वाढून 16 लाख 50 हजार 39 कोटी रुपयांवर गेले आहे.