सोने घसरणार 55 हजारांपर्यंत?

अमेरिकन तज्ज्ञांच्या अंदाजाने सराफ बाजारात खळबळ
Gold- Silver Rate
सोने, चांदी दरात वाढ(file photo)
Published on
Updated on

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांत उच्चांकी पोहोचलेल्या सोन्याच्या किमतींमुळे गुंतवणूकदारांसाठी अत्यंत सुकाळ आला आहे; परंतु दागिने खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी मात्र ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. सोन्याच्या किमतीचा वाढत जाणारा आलेख कोठे थांबेल याची निश्चिती नसली, तरी बाजार विश्लेषकांच्या मते, सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळू शकते, यामुळे रिटेल खरेदीदारांची चांदी होणार आहे. काही भविष्यवाण्यांमध्ये तर सोने दरात 38 टक्के घसरणीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय बाजाराचा विचार केला, तर सोन्याचा भाव 55 हजार रुपये प्रतितोळा इतका कमी येईल, असा अंदाज आहे. यामुळे जागतिक गुंतवणूक धोरण बदलून जाण्याची शक्यता आहे. सोन्याची ही स्वस्ताई भारतीय ग्राहकांसाठी मात्र मोठी पर्वणी ठरणार आहे, थोड्याच दिवसांवर आलेली अक्षय तृतीया आणि सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमध्ये सोने खरेदी जोरात होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील वित्तीय सेवा कंपनी ‘मॉर्निंगस्टार’चे बाजार विश्लेषक जॉन मिल्स यांनी अंदाज व्यक्त केला की, आगामी काळात सोने 1,820 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरू शकते, जे सध्या 3,080 डॉलर प्रति औंसच्या किमतीच्या तुलनेत खूप खाली जाईल. यामुळे जवळपास 38 टक्के कमी होईल, ज्यामुळे सोने बाजारात आमूलाग्र बदल घडू शकतो. सोन्याच्या दरात गेल्या सहा महिन्यांत झालेली प्रचंड वाढ जागतिक घडामोडींच्या परिणामामुळे थांबली असून, जॉन मिल्स यांच्या भविष्यवाणीचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास 4,000 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. सोमवारी (दि. 7) भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 90,380 प्रति 10 ग्रॅम झाला आहे. जॉन मिल्स यांना अपेक्षित असलेली घट झाली तर सोन्याच्या किमती 10 ग्रॅमसाठी सुमारे 55,496 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात.

सोने दरातील अलीकडच्या काळात आलेली तेजी ही भू-राजकीय अस्थिरता, आर्थिक अस्थिरता आणि महागाईच्या चिंतेमुळे झाली. गुंतवणूकदारांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेतील आणि जागतिक बाजारातील चढ-उतारांच्या भीतीने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने निवडले आहे. सोन्याच्या दरात सध्या झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मिल्स आणि इतर विश्लेषक मानतात की, अनेक कारणांचा एकत्र परिणाम होऊन सोन्याच्या किमतींमध्ये तीव्र घट येऊ शकते.

घटत जाणारे मागणी संकेत

केंद्रीय बँका आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले असले, तरी अलीकडील डेटा दर्शवितो की, हा ट्रेंड दीर्घकाळ टिकणार नाही. केंद्रीय बँकांनी गेल्यावर्षी 1,045 टन सोने खरेदी केले. 1,000 टनांपेक्षा जास्त सोने खरेदी करण्याचे हे तिसरा सलग वर्ष होते. तथापि, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या सर्वेक्षणाने दर्शविले की, 71 टक्के केंद्रीय बँका त्यांच्या सोनेसाठ्यात वाढ करण्याऐवजी कमी किंवा समतोल राखण्याच्या बाजूने असतात. मोठ्या संकटांनंतर सोन्याच्या किमती वाढतात आणि नंतर आर्थिक स्थैर्य परत आल्यावर कमी होतात, हे कोरोना महामारीमध्ये आपणास पाहायला मिळाले आहे.

बाजारातील संतृप्तता

सोने उद्योगात विलीनीकरण आणि अधिग्रहणांच्या वाढीमुळे बाजारातील उच्चांकाचे संकेत मिळतात. 2024 मध्ये, सोने क्षेत्रातील व्यवहार 32 टक्के वाढले, ज्यामुळे बाजार गरम झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, सोन्याच्या आधारावर असलेल्या एक्सचेंज-ट्रेडेड फंड गुंतवणुकीत अलीकडील वाढ मागील तीव्र किंमत सुधारण्यापूर्वीच्या पॅटर्नसारखी दिसते, ज्यामुळे घट येऊ शकते, याबद्दल चिंता वाढली आहे.

भारतीय बाजार बहरणार

भारतात सोन्याला केवळ गुंतवणुकीचा नाही, तर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिकद़ृष्ट्याही महत्त्व आहे. थोड्याच दिवसांवर आलेली अक्षय तृतीया आणि सध्या सुरू असलेली लग्नसराई हे काळ सोने खरेदीसाठी महत्त्वाचे असतात. सोन्याच्या दरात जर इतकी घरसण झाली, तर भारतीय ग्राहकांसाठी ती पर्वणीच असेल.

बँक ऑफ अमेरिकाची भविष्यवाणी; मात्र विरुद्ध दिशेची

मिल्स यांनी सोने दरात घसरणीची भविष्यवाणी केली असली, तरी बँक ऑफ अमेरिका आणि गोल्डमन सॅक्ससारख्या प्रमुख आर्थिक संस्थांना मात्र सोने दरात अजूनही उसळी येण्याची शक्यता आहे. बँक ऑफ अमेरिकाने अंदाज व्यक्त केला की, सोने पुढील दोन वर्षांत प्रति औंस 3,500 डॉलर पर्यंत वाढू शकते, तर गोल्डमन सॅक्सने अपेक्षा व्यक्त केली आहे की, किमती वर्षाच्या अखेरीस प्रति औंस 3,300 डॉलरपर्यंत पोहोचतील.

वाढीव पुरवठा

जागतिकस्तरावर सोनेपुरवठा जलदगतीने वाढत आहे. 2024 च्या दुसर्‍या तिमाहीत सोने खाणींचा नफा प्रति औंस 950 डॉलरपर्यंत पोहोचला होता, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. यामुळे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन मिळाले. जागतिक सोन्याचे राखीव साठे 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन झाले आहेत. विशेषतः, ऑस्ट्रेलियाने आपल्या सोने उत्पादनात वाढ केली आहे. याशिवाय आधी गुंतवणूक केलेल्या वापरकर्त्यांनी वाढते दर पाहून जुने सोने बाजारात विक्रीस आणले आहे. या वाढत्या पुरवठ्याने किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news