

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थलांतरित वन्य जीव प्रजातींच्या संवर्धनावरील परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, वाढत्या तापमानामुळे हिमालय आणि उत्तर भारतातील स्थलांतरित प्रजातींवर गंभीर परिणाम होत आहे. वाढत्या तापमानामुळे कस्तुरी मृग, तीतर आणि स्नो ट्राऊट यांसारख्या थंडीस जुळवून घेणार्या प्रजातींना जास्त उंचीवर स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे त्यांच्यासाठी लहान आणि तुटलेले निवासस्थान उपलब्ध होत आहे. अहवालाने स्थलांतरित प्रजातींवरील वाढत्या धोक्यांना त्वरित सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.
अहवालात म्हटले आहे की, हवामान बदलामुळे उत्तराखंडमधील लहान सस्तन प्राणी त्यांचे अर्ध्याहून अधिक नैसर्गिक क्षेत्र गमावू शकतात. याशिवाय, आशियाई हत्तींसारख्या विशाल प्राण्यांनाही ‘निवासस्थान कोंडी’चा सामना करावा लागत आहे. मर्यादित मार्गांमुळे भारतातील आणि श्रीलंकेतील बहुतेक हत्ती त्यांच्या नवीन निवासस्थानांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
स्थलांतरित प्रजाती मानवी जीवन टिकवून ठेवणार्या परिसंस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जंगलांमध्ये कार्बन साठवणुकीला मदत करणार्या हत्तींपासून ते महासागरात आवश्यक पोषक तत्त्वे फिरवणार्या व्हेल माशांपर्यंत या प्रजाती निरोगी परिसंस्था टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सीएमएसच्या कार्यकारी सचिव एमी फ्रँकेल यांनी, स्थलांतरित प्राणी हे ग्रहासाठी ‘अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ आहेत आणि ते धोक्यात आहेत, असे म्हटले आहे.
तापमानवाढीमुळे कस्तुरी मृग, तीतर आणि स्नो ट्राऊट यांसारख्या प्रजातींना उंच ठिकाणी स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे.
आशियाई हत्ती मर्यादित स्थलांतर मार्गांमुळे ‘निवासस्थान कोंडी’त अडकले आहेत. त्यामुळे मानवी-हत्ती संघर्ष वाढत आहे.
वन्य जीव प्रजाती परिसंस्थेतील कार्बन साठवण आणि पोषक तत्त्वांचे वहन यांसारख्या कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.