

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली ‘आतंकवाद्यांना मातीत मिळवू’ ही चेतावणी प्रत्यक्षात उतरली आहे. अवघ्या 15 दिवसांत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जबरदस्त कारवाई करत सुमारे 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख कमांडर अब्दुल रऊफ अजहर ठार झाला.
अजहरच्या मृत्यूची बातमी समजताच भारतात सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच, अमेरिका आणि इस्रायलमध्येही विशेष आनंदाचे वातावरण आहे. अमेरिकन-यहूदी पत्रकार डॅनियल पर्लच्या हत्या प्रकरणात अजहर प्रमुख आरोपींपैकी होता. त्यामुळे या कारवाईने केवळ पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही, तर 23 वर्षांपूर्वीच्या त्या जखमेवरही न्याय दिला, ज्याने संपूर्ण जग हादरले होते.
2002 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल यांचे कराचीत अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पर्ल हे पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी संघटनांमधील संबंधांची चौकशी करत होते. या हत्येचा मास्टरमाईंड होता उमर सईद शेख, ज्याला 1999 मध्ये आईसी-814 विमान अपहरणप्रकरणी भारत सरकारने सोडले होते. या अपहरणाच्या कटात अब्दुल रऊफ अजहरदेखील सहभागी होता आणि त्याच्यामुळे हा ‘कंधार प्रकरण’ म्हणून ओळखला जातो.
अजहरच्या मृत्यूवर प्रतिक्रिया देताना डॅनियल पर्लची मैत्रीण आणि पत्रकार असरा नोमानी हिने द (ट्विटर) वर लिहिले, ‘माझा मित्र डॅनी पर्ल 2001 मध्ये बहावलपूरला गेला होता, फक्त पेन आणि वही घेऊन. त्याने तेथील दहशतवादी अड्ड्यांचे सत्य जगासमोर आणले.’ अमेरिकन कार्यकर्त्या एमी मेक यांनीही भारताच्या कारवाईचे स्वागत करत म्हटले, ‘भारताने पर्लच्या हत्येचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूरने दहशतीचा अड्डा उद्ध्वस्त केला. पाश्चिमात्य देशांनी भारताकडून शिकायला हवं की इस्लामिक दहशतवादाशी कसं लढायचं.’ भारताच्या आत्मरक्षणाच्या अधिकाराला अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स , इस्त्रा यल, नेदरलँड आणि पनामा यांचा पाठिंबा मिळाला आहे. या देशांनी भारतासोबत एकजुटीने उभं राहण्याची भूमिका घेतली आहे.