

छत्तीसगड : पश्चिम बंगालमधील कोलकात्याचे रहिवासी असलेले इंद्रजित भट्टाचार्य यांची पत्नी परम भट्टाचार्य आपल्या दोन मुली आणि काही नातेवाईकांसह छत्तीसगडमधील कान्हा राष्ट्रीय उद्यानात फिरायला आल्या होत्या. मुलगी आदित्री (वय 10) हिचा वाढदिवस असल्याने आईने ही ट्रिप आयोजित केली होती. कान्हाहून परतत असताना त्यांच्या बोलेरो गाडीला भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात कुटुंबातील पाचजणांचा मृत्यू झाला. रात्री कुटुंबीय आदित्रीचा वाढदिवस साजरा करणार होते. पण नियतीने सर्व काही हिरावून घेतले. अपघाताची बातमी मिळताच इंद्रजित भट्टाचार्य कोलकात्याहून तेथे पोहोचले. रुग्णालयातून पत्नी आणि मुलीचे शव घेऊन अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे ते निघाले. स्मशानभूमीत वडिलांनी सांगितले की, आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. तेथील लोकांनी तातडीने केक मागवला. स्मशानभूमी फुग्यांनी आणि फुलांनी सजवली गेली. आदित्रीच्या फोटोला वाढदिवसाची टोपी लावण्यात आली. वडिलांनी मुलीचे आवडते वाढदिवसाचे गाणे म्हटले आणि नंतर केक कापला. स्मशानभूमीतील ही घटना पाहून सर्वाचे डोळे पाणावले.