

Gangetic dolphin hunted Bihar : बिहारमधील कोसी नदीतून एका दुर्मिळ डॉल्फिनला पकडून घरी घेऊन जाणाऱ्या मच्छिमाराला सहरसा जिल्ह्यात अखेर अटक करण्यात आली आहे. डॉल्फिनला घेऊन जाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर वन विभाग आणि बिहार पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मच्छिमार कोशी नदीत मासेमारीसाठी गेला असता त्याच्या जाळ्यात एक दुर्मिळ 'गंगेचा डॉल्फिन' (Gangetic Dolphin) अडकला. त्याला तत्काळ पाण्यात परत सोडण्याऐवजी तो मच्छिमार डॉल्फिनला थेट घरी घेऊन निघाला. एका वाटचाऱ्याने या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करून सोशल मीडियावर अपलोड केला. व्हायरल व्हिडिओमध्ये हा मच्छिमार डॉल्फिनचे तेल काढण्याबाबत बोलताना ऐकू येत होता.
हा व्हिडिओ वन विभाग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचताच आरोपीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला होता. पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने सलग दोन दिवस शोधमोहीम राबवून तिसऱ्या दिवशी त्याला ताब्यात घेतले.उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) ओमप्रकाश यांनी सांगितले की, "डॉल्फिनची शिकार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभाग आणि बिहार पोलीस या प्रकरणात संयुक्तपणे कारवाई करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले जाईल."
या घटनेमुळे भारतातील डॉल्फिनच्या कायदेशीर संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'गंगेचा डॉल्फिन' ही एक संकटग्रस्त प्रजाती असून त्याला भारताचा 'राष्ट्रीय जलचर प्राणी' म्हणून घोषित करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत डॉल्फिनची शिकार करणे किंवा त्याला मारणे हा गंभीर आणि दखलपात्र अपराध आहे. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंतचा कारावास आणि मोठ्या दंडाची तरतूद आहे.