

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : उत्तर भारतात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून, उत्तर प्रदेश आणि बिहारसह पाच राज्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असून, वाराणसी आणि प्रयागराजमध्ये गंगेच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही मुसळधार पाऊस झाला आहे.
उत्तर प्रदेशातील 12 जिल्ह्यांना पुराचा वेढा पडला असून, यामध्ये प्रयागराज आणि काशी (वाराणसी) या प्रमुख शहरांचा समावेश आहे. वाराणसीमध्ये रविवारी सकाळी 6 वाजता गंगेची पाणीपातळी ओलांडली आहे. वाराणसी आणि प्रयागराजमध्ये गंगेचे पाणी एक लाखांहून अधिक घरांमध्ये शिरले आहे. प्रयागराजमध्ये यमुना नदीलाही पूर आला असून, येथील 10 हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी साचले आहे. काशीचे प्रसिद्ध 84 घाट पूर्णपणे गंगेच्या पाण्यात बुडाले आहेत. गंगा, यमुना आणि बेतवा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बिहारमध्येही पावसाचा जोर कायम आहे.
हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. दरड हटवणार्या जेसीबीवर डोंगरावरून मोठा दगड कोसळला. यात जेसीबी दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला. राजस्थानमधील बिकानेरच्या नोखा येथे दोन घरे कोसळली, तर खबरदारी म्हणून आसपासची 7 घरे रिकामी केली आहेत. दोन्ही राज्यांत पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.