

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एकीकडे उत्तर भारतात पावसाने आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर दुसरीकडे राजस्थानमधून मान्सूनने वेळेआधीच परतीचा प्रवास सुरू केला आहे. उन्नावमध्ये रस्त्यांवरून बोटी चालवण्याची वेळ आली आहे, तर हिमाचल प्रदेशात मृतांचा आकडा 400 पार गेला आहे. या विरोधाभासी चित्रामुळे देशात एकाच वेळी चिंता आणि काहीसा दिलासा असे संमिश्र वातावरण आहे.
उत्तर भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा आणि त्यामुळे आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. परिस्थिती गंभीर असून, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. उन्नावमध्ये गंगेच्या काठावरची 80 गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीसाठी होडींचा वापर केला जात आहे, ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मणिपूरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. बचावकार्य वेगाने सुरू असले, तरी अनेक भागांशी संपर्क तुटला आहे.
पंजाबमध्येही पावसाने आणि पुरामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आतापर्यंतच्या अंदाजानुसार, नुकसानीचा आकडा 14,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय तेलंगणा आणि उत्तराखंडमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.