

नवी दिल्ली : मुंबई आणि कोकणदरम्यानची रेल्वे जोडणी आणखी मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-सावंतवाडी रोड या नव्या दैनंदिन एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखविला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुमारे ५१० किलोमीटर अंतराच्या या नव्या रेल्वे सेवेमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरेल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, गणेशोत्सवासाठी यंदा ३५० विशेष गाड्या चालविण्यात येत असून, गरज भासल्यास ही संख्या ३७० पर्यंत वाढविण्याची तयारी करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक १५०८७ ही एक्स्प्रेस दररोज रात्री ११.५५ वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १५०८८ ही सायंकाळी ५.२० वाजता सावंतवाडी रोडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता मुंबईत पोहोचेल.
या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
पीयूष गोयल यांनी ही सेवा केवळ एक रेल्वे नसून कोकणच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. सुधारित रेल्वे जोडणीमुळे पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थी, नोकरदार आणि मुंबईत काम करणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सेवा कोकणवासीयांसाठी आणि गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी भेट असल्याचे म्हटले.
दरम्यान, मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. मुंबईसाठी २३८ नव्या वातानुकूलित लोकल रेक मंजूर करण्यात आले असून, पहिल्या एसी लोकलची डिलिव्हरी २०२७ पासून सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.