

AI Summit RoboDog Controversy
नवी दिल्लीतील 'एआय समिट'मध्ये (AI Summit) चीनी बनावटीच्या रोबोडॉगमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ग्रेटर नोएडा येथील गलगोटिया विद्यापीठाच्या (Galgotias University) प्राध्यापिका नेहा सिंह (Neha Singh) यांची 'वेझर इन्नोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीने पाठराखण केली आहे. कंपनीने त्यांना सन्मानजनक नोकरीची अधिकृत ऑफर दिली आहे. दरम्यान, नेहा सिंह यांना निलंबित करण्यात आलेले नाही. या प्रकरणी तपास पूर्ण होईपर्यंत चूक का घडली, हे स्पष्ट होईपर्यंत त्यांना थांबण्यास सांगण्यात आल्याचे युनिव्हर्सिटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
'वेझर इन्नोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मागील काही तासांमध्ये नेहा सिंह यांच्याबाबत घडलेल्या घडामोडी दुर्दैवी आहेत. नेहा सिंह यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी विद्यापीठाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. विद्यापीठानेच त्यांना चुकीची माहिती पुरवली होती. त्या 'एआय' (AI) विभागाचा भाग नसल्यामुळे त्यांना तांत्रिक वास्तवाची कल्पना नव्हती. त्यांच्याकडे राजीनामा मागण्यात आला असेल तर त्यांना जाणूनबुजून 'बळीचा बकरा' बनवण्यात आले आहे.
"नेहा सिंह यांच्या बोलण्याच्या शैलीवरून त्या कोणत्याही संस्थेसाठी एक उत्तम संवादक सिद्ध होतील, याची आम्हाला खात्री आहे. आम्ही त्यांना केवळ पाठिंबाच देत नाही, तर आमच्या कंपनीत एका चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफरही देत आहोत," असे कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच सध्या नेहा सिंह यांचे लिंक्डइन प्रोफाइल डिअॅक्टिव्हेट (बंद) झाले आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा विश्वासाचा आणि आशेचा संदेश पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया समुदायाने मदत करावी, असे आवाहन वेझर इन्नोव्हेशन्सकडून करण्यात आले आहे.
या वादामुळे सोशल मीडियावर नेहा सिंह यांच्या नोकरीबाबत चर्चा सुरू झाली. त्यांचे लिंक्डइन प्रोफाइल 'ओपन टू वर्क' (Open to Work) असे होते. त्यामुळे त्यांना निलंबित केले आहे का, असा सवाल केला जाऊ लागला. नेहा सिंह यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, एका चुकीच्या स्पष्टीकरणामुळे इंटरनेटवर मोठा गदारोळ झाला आहे. मला म्हणणं योग्यरित्या मांडता आले नाही.
दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'एआय इम्पॅक्ट समिट २०२६'मध्ये नेहा सिंह यांनी असा दावा केला होता की, पाळीव प्राण्यासारखा दिसणारा रोबोडॉग गलगोटिया विद्यापीठाच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये विकसित करण्यात आला आहे. मात्र काही तासांमध्येच हा रोबोडॉग प्रत्यक्षात चीनच्या युनिट्री (Unitree) या रोबोटिक्स कंपनीची निर्मिती असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला नामुष्कीला सामोरे जावे लागले. विद्यापीठाला समिटमधून आपला स्टॉल हटवावा लागला. गलगोटिया विद्यापीठाचे कुलसचिव नितीन कुमार गौर यांनी स्पष्ट केले आहे की, देशाची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा कधीही उद्देश नव्हता. तसेच प्राध्यापिका नेहा सिंह यांना अद्याप निलंबित केलेले नाही.