Dharmendra Pradhan: पेपरफुटीविरोधात पोलिसांचा मार खाल्ला, आज त्याच मुद्द्यावरून राजीनामा दिला; धर्मेंद्र प्रधानांची कहाणी

Dharmendra Pradhan Resignation: विद्यार्थी नेता ते केंद्रीय शिक्षणमंत्री असा त्यांचा तीन दशकांचा राजकीय प्रवास पुन्हा चर्चेत आला आहे.
Dharmendra Pradhan Resignation
Dharmendra Pradhan ResignationPudhari
Published on
Updated on

Dharmendra Pradhan Resignation: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याभोवती सध्या निर्माण झालेल्या NEET पेपरफुटी वादामुळे देशभरात त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र या संपूर्ण घडामोडीत एक मोठा विरोधाभास समोर आला आहे. ज्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर दबाव होता, त्याच पेपरफुटीविरोधात सुमारे तीन दशकांपूर्वी त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केले होते आणि पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमीही झाले होते.

1997 मधील आंदोलनाची पुन्हा चर्चा

1997 मध्ये ओडिशात तत्कालीन मुख्यमंत्री जे. बी. पटनायक सरकारच्या काळात बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा वाद निर्माण झाला होता. त्या घटनेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) भुवनेश्वरमध्ये मोठे आंदोलन केले होते. त्या आंदोलनाचे नेतृत्व धर्मेंद्र प्रधान यांनी केले होते.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्याने अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते. त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचाही समावेश होता. त्या काळातील आंदोलनाची माहिती आणि वृत्तांकन पुन्हा चर्चेत आले आहे.

आंदोलनातील सहकाऱ्यांची आठवण

त्या आंदोलनात सहभागी झालेले आणि सध्या भुवनेश्वरमधील राजा माधवानंद देव महाविद्यालयाचे अध्यक्ष असलेले प्रशांत राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्या काळात राज्यात पेपरफुटीच्या घटना वारंवार घडत होत्या. त्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र नाराजी होती.

त्यांच्या म्हणण्यानुसार, जुलै 1997 मध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी विधानसभेसमोर निदर्शने केली होती. आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अनेक कार्यकर्त्यांसह धर्मेंद्र प्रधानही जखमी झाले होते.

राऊत यांनी त्या दशकाला "पेपरफुटीचे दशक" असे संबोधत, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात विद्यार्थी संघटनांनी सातत्याने आवाज उठवला होता, असं सांगितलं.

Dharmendra Pradhan Resignation
Prithviraj Chavan: 'मोदी सरकारचा शेवट जवळ आला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

29 वर्षांनंतर परिस्थिती बदलली

आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले, त्यांची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा.

20 जुलै 2026 रोजी दिल्लीतील आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे 1997 मध्ये स्वतः आंदोलनात लाठीहल्ला सहन करणारे धर्मेंद्र प्रधान आणि आज त्यांच्याविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

विद्यार्थी राजकारणातून राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत

धर्मेंद्र प्रधान यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी चळवळीतूनच सुरू झाला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. पुढे ते तालचेर महाविद्यालय विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले.

यानंतर त्यांनी उत्कल विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्या वेळी जनता दलाशी संबंधित विद्यार्थी नेते अरुण साहू विजयी झाले होते, तर धर्मेंद्र प्रधान तिसऱ्या क्रमांकावर होते.

त्या काळातील विद्यार्थी नेत्या सिंधुज्योती त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, धर्मेंद्र प्रधान सुरुवातीला कॅम्पसमध्ये फारसे परिचित नव्हते. मात्र ABVP चे मजबूत संघटन आणि सातत्यपूर्ण कामामुळे त्यांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Dharmendra Pradhan Resignation
CJP Protest: BBC, CNN, NYT, Guardian... धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची जगभर चर्चा; आंतरराष्ट्रीय माध्यमं काय म्हणतात?

राजकीय प्रवास

विद्यार्थी राजकारणानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी भाजपमध्ये संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1994 मध्ये ते ABVP चे राष्ट्रीय सरचिटणीस झाले. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि विविध राज्यांचे प्रभारी अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली.

2000 मध्ये त्यांनी ओडिशा विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान निर्माण केले.

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले. पुढे शिक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली.

ओडिशातील भाजप विस्तारात महत्त्वाची भूमिका

राजकीय विश्लेषकांच्या मते, ओडिशामध्ये भाजपचे संघटन मजबूत करण्यात धर्मेंद्र प्रधान यांचे मोठे योगदान आहे. केंद्रात मंत्री असतानाही ते नियमितपणे ओडिशात जाऊन पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधत असत. अनेक स्थानिक नेत्यांच्या मते, तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क ही त्यांची मोठी ताकद होती.

विरोधाभासाची चर्चा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजकीय प्रवासातील राजीनाम्याचा हा प्रसंग आता चर्चेचा विषय ठरला आहे. एकेकाळी पेपरफुटीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आणि पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेले विद्यार्थी नेते, आणि आज त्याच प्रकारच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा राजीनामा देणारे केंद्रीय मंत्री, हा विरोधाभास राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news