

नवी दिल्ली : दिल्लीला खलिस्तान करण्याची सोमवारी (दि. २३) पुन्हा एकदा धमकी मिळाली. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन, दिल्ली विधानसभा, शाळा आणि विविध संस्थांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले. यामुळे राजधानीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. नवीन महाराष्ट्र सदनसह राजधानीतील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांजवळ अतिरिक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली. विविध ठिकाणी बॉम्बचा तपास घेतला असता धमकी खोटे असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्यानंतर दिल्लीतील सर्व मेट्रो स्थानकांवर आणि प्रमुख ठिकाणी सुरक्षा कडक करण्यात आली. खलिस्तान नॅशनल आर्मीने पाठवलेल्या ईमेलमध्ये "दिल्ली बनेगा खलिस्तान" असे लिहिले होते आणि पुढील तीन दिवसांत दिल्ली आर्मी स्कूल, लाल किल्ला आणि मेट्रो स्थानकांवर स्फोट होण्याची धमकी देण्यात आली होती. संदेशांमध्ये दावा करण्यात आला होता की आर्मी स्कूलमध्ये दुपारी १.११ वाजता, विधानसभेत दुपारी ३.११ वाजता आणि लाल किल्ल्यावर आज सकाळी ९.११ वाजता स्फोट होतील, असे अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी सांगितले की अलर्ट असलेल्या ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली आणि काहीही संशयास्पद आढळले नाही. लाल किल्ला, दिल्ली सचिवालय आणि विधानसभा संकुलासह संवेदनशील ठिकाणी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथक तैनात करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी देखील खलिस्तान नॅशनल आर्मीने असाच धमकीचा ईमेल अनेक शाळांना पाठवण्यात आला होता. संसदेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी यावेळी देण्यात आली होती आणि दिल्लीला खलिस्तान बनवण्याची भाषा करण्यात आली होती.