

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये हिंसाचाराचे सत्र सुरुच असून, रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी जिरीबाम जिल्ह्यात बाबुपारा येथे आंदोलकांना पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात २० वर्षीय आंदोलक तरुणाचा मृत्यू झाला. जमावाने या परिसरातील भाजप आणि काँग्रेस कार्यालयात तोडफोड करत आग लावली. जिरीबाम पोलीस ठाण्याच्या परिसरात हा हिंसाचार झाला. दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचारावरील उपाय योजनांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.१८) दिल्ली वरिष्ठ अधिकार्यांची बैठक होणार आहे.
जमावाने केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात २३ जणांना अटक करण्यात आली आहे. एक ३२ पिस्तूल, सात राऊंड एसबीबीएल आणि आठ मोबाईल फोन जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. दरम्यान, एकाच कुटुंबातील सहा जणांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर जिरीबाम जिल्ह्यांमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या ताज्या घटनांमध्ये 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
राज्यातील हिंसाचारावर तोडगा काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) ने भाजपच्या नेतृत्वाखालील मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. 'एनपीपी'चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी रविवारी भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांना पत्र लिहून राज्यातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. २०२२ मध्ये मणिपूर विधानसभेची निवडणूक झाली होती. एकूण ६० जागांपैकी ३२ जागा जिंकत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) ७जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना २१ जागा मिळाल्या होत्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (दि.१७) मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन आणि गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. रविवारी( दि.१७) अमित शहा यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभा रद्द करुन दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी मणिपूरमधील सुरक्षेच्या परिस्थितीचाही आढावा घेतला होता.
११ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरक्षा दलांशी झालेल्या भीषण चकमकीत मणिपूरमध्ये दहा दहशतवादी ठार झाले. यानंतर काही तासांनी दहशतवाद्यांनी जिरिबामजिल्ह्यातील महिला आणि मुलांसह सहा नागरिकांचे अपहरण केले. दहशतवाद्यांनी तीन महिला आणि तीन मुलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. संतप्त झालेल्या लोकांनी शनिवारी (दि.१६) तीन राज्यमंत्री आणि सहा आमदारांच्या निवासस्थानांवर हल्ला केला. अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू असतानाही हिंसाचाराचे सत्र पुन्हा सुरु झाले. संतप्त झालेल्या लोकांनी त्यांची घरे जाळली. मे २०२३ मध्ये कुकी-झो गटांमधील वांशिक हिंसाचारात 220 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो बेघर झाले आहेत. मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली होती.