

नवी दिल्ली : गुगल कंपनी समुद्राखाली नवीन ऑप्टिकलफायबर केबल टाकणार असून ती आंध्र प्रदेश, महाराष्ट्राला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाशी जोडणार आहे. तसेच अमेरिका आणि भारतादरम्यान चार सामरिक फायबर मार्ग विकसित केले जाणार आहेत, अशी माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी नवी दिल्लीत भेट घेतली. ते ‘एआय इम्पॅक्ट समिट 2026’मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. या परिषदेत 20 फेब्रुवारी रोजी ते की-नोट भाषण करणार आहेत.
गुगल आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे उभारण्यात येणार्या प्रस्तावित एआय हबसोबत सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना जोडणारे तीन नवीन समुद्री केबल मार्ग तयार करणार आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये गुगलने पाच वर्षांत 15 अब्ज डॉलर गुंतवणूक करून अमेरिकेबाहेरील सर्वात मोठा एआय इन्फ्रास्ट्रक्चर हब विशाखापट्टणम येथे उभारण्याची योजना जाहीर केली होती.
मुंबईहून पश्चिम ऑस्ट्रेलियापर्यंत थेट केबल टाकण्यात येणार असून त्यामुळे मुंबई आणि चेन्नई लँडिंग स्टेशनवरील अवलंबित्व कमी होईल. भारताची डिजिटल संरचना अधिक मजबूत होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
25,000 कि.मी.पर्यंत नेटवर्क, अनेक देशांना जोडणी
गुगलने भारत आणि अमेरिका यांच्यातील डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी ‘अमेरिका - इंडिया कनेक्ट’ हा समुद्राखालील ऑप्टिकल फायबर केबल प्रकल्प जाहीर केला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या नेटवर्कची एकूण संभाव्य लांबी 15,000 ते 25,000 किलोमीटरपर्यंत असू शकते. भारतातून विशाखापट्टणम, चेन्नई आणि मुंबई येथील लँडिंग स्टेशनमार्गे केबल्स सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका येथे पोहोचतील. त्यानंतर या मार्गांची जोडणी अमेरिकेच्या पूर्व व पश्चिम किनार्यावरील नेटवर्कशी होईल.
हे महत्त्वाचे लाभ
भारत, अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांसह अनेक आंतरराष्ट्रीय नेटवर्क्स जोडले जातील. तज्ज्ञांच्या मते, ही केबल प्रणाली क्लाऊड सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल बँकिंग आणि जागतिक डेटा ट्रान्स्फर अधिक वेगवान, सुरक्षित आणि स्थिर करणार आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.