

इम्फाळ; वृत्तसंस्था : मणिपूरमधील विविध जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या 48 तासांत धडक कारवाई करत बंदी असलेल्या पीआरईपीएके (पीआरओ) या संघटनेच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी खंडणी वसुलीच्या कामात गुंतले असल्याचा आरोप आहे. क्षेत्रीमयुम लैबा मैतेई (वय 42), थोकचोम रबिचंद्र सिंग (36), खुरैजम रोजितकुमार सिंग (37) अशी अटक केलेल्या चार दहशतवाद्यांपैकी तिघांची नावे आहेत.
दहशतवाद्यांच्या अटकेसोबतच सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या शोध मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त केली आहेत. त्यामध्ये एके-47 रायफल (मॅगझिनसह), तीन सिंगल-बॅरल रायफल, एक बोल्ट-अॅक्शन रायफल आणि स्कोप असलेली एक स्नायपर रायफल, दोन गावठी बोल्ट-अॅक्शन बंदुका, चार पिस्तुलं, दोन ग्रेनेड, एक बॉम्ब आणि जिवंत काडतुसे यांचा समावेश आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांकडून सतत कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे.