

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : स्त्रीच्या आयुष्यात मासिक पाळी आणि वयानुसार कमी होत जाणारी प्रजननक्षमता (Fertility) या अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक बाबी मानल्या जातात. दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीमुळे महिलांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते; तर दुसरीकडे, वाढत्या वयासोबतच ‘जैविक घड्याळ’ (Biological Clock) पुढे सरकत असल्याने आई होण्याचा दबावही वाढत जातो. मात्र, जगभरातील महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि क्रांतीकारक बातमी समोर आली आहे. चीनमधील एका नव्या संशोधनानुसार, महिलांची मासिक पाळी वर्षातून १२ ऐवजी केवळ ४ वेळा आणणे शक्य असून यामुळे महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीही (अगदी वृद्धापकाळातही) गर्भधारणा करणे शक्य होऊ शकते.
चीनमधील ‘स्टेट की लॅबोरेटरी ऑफ स्टेम सेल अँड रिप्रॉडक्टिव्ह बायोलॉजी’ येथील जीवशास्त्रज्ञ डॉ. होंगमेई वांग (Dr. Hongmei Wang) यांच्या नेतृत्वाखालील एका तज्ज्ञ पथकाने हे लक्षवेधी संशोधन केले आहे. या संशोधनामुळे वैद्यकीय विश्वात एकच खळबळ उडाली असून, जगभरातील शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
निसर्गतः प्रत्येक स्त्रीच्या शरीरात जन्माच्या वेळीच अंडाशयात (Ovary) अंड्यांची (Eggs) एक निश्चित संख्या असते. मुलीला वयात आल्यानंतर जेव्हा मासिक पाळी सुरू होते, तेव्हा प्रत्येक महिन्याच्या पाळीदरम्यान या साठ्यातील काही अंडी परिपक्व होतात आणि नष्ट होतात. जेव्हा अंडाशयातील हा अंड्यांचा साठा पूर्णपणे संपतो, तेव्हा स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजेच ‘मेनोपॉज’ (Menopause) येतो. साधारणपणे वयाच्या ४५ ते ५५ वर्षांच्या दरम्यान ही अवस्था येते. मेनोपॉजनंतर स्त्री नैसर्गिकरीत्या आई बनू शकत नाही.
डॉ. वांग यांच्या पथकाने याच प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, जर स्त्रियांची मासिक पाळी वर्षातून १२ वेळा येण्याऐवजी ती वैद्यकीय हस्तक्षेपाने केवळ ४ वेळाच आणली, तर अंड्यांच्या नष्ट होण्याचा वेग लक्षणीयरीत्या कमी होईल. यामुळे अंडाशयातील अंड्यांचा साठा (Ovarian Reserve) अधिक काळ सुरक्षित राहील. पर्यायाने ‘मेनोपॉज’ची वेळ अनेक वर्षांनी पुढे ढकलली जाईल आणि महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीही, अगदी उतारवयातही आई होण्याचे सुख अनुभवता येईल.
संशोधकांनी या सिद्धांताची पडताळणी करण्यासाठी ‘प्रायमेटस्'वर (माकडे/वानरे) यशस्वी प्रयोग केले आहेत. या प्रयोगात अत्याधुनिक स्टेम सेल तंत्रज्ञानाचा (Stem Cell Technology) वापर करण्यात आला. शास्त्रज्ञांनी माकडांमध्ये कृत्रिमरीत्या अंडाशयाची क्रियाशीलता निर्माण केली. अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे, या प्रयोगातून एका जिवंत आणि निरोगी पिल्लाचा जन्म झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. मानवाच्या अत्यंत जवळच्या प्रजातीवर हा प्रयोग यशस्वी झाल्याने, मानवी शरीरावरही हे तंत्रज्ञान प्रभावी ठरेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटत आहे.
डॉ. होंगमेई वांग यांच्या नेतृत्वाखालील हे संशोधन अद्याप प्राथमिक आणि प्रायोगिक स्तरावर असले तरी, वैद्यकीय क्षेत्रातील हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाल्यास, स्त्री-आरोग्य आणि प्रजननाच्या संकल्पना पूर्णपणे बदलून जातील यात शंका नाही.