

Former Justice Abhay S Oka: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीवर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, सध्याच्या अंधश्रद्धेविरूद्ध लढण्यासाठी भारतात वैज्ञानिक दृष्टीकोण रूजवला पाहिजे. मात्र जे कोण धार्मिक सुधारणांबाबत बोलतो त्याला धार्मिक संघटना टार्गेट करतात.
अभय ओक हे नवी दिल्ली येथील तारकुंदे मेमोरियल फाऊंडेशन यांनी आयोजित केलेल्या १६ व्या व्ही. एम. तारकुंदे मेमोरियल लेक्चर कार्यक्रमात म्हणाले, 'जरी आपलं संविधान हे अस्तित्वात येऊन ७६ वर्षे झाली असली तरी आपला समाज हा काही फार सुधारणा आणि वैज्ञानिक दृष्टीकोण विकसित करावा याच्या समर्थनात आहे असं नाही. दुर्दैव म्हणजे आपल्या समाजात जो कोणी विज्ञानाच्या आधारे धार्मिक सुधारणांबाबत बोलेल त्यांना संबंधित धार्मिक समुहाकडून टार्गेट केलं जातं. हे सर्व धर्मांसाठी लागू पडतं.'
ते पुढे म्हणाले, 'भारतासारख्या देशाला वैज्ञानिक दृष्टीकोणाची विशेष अन् तात्काळ गरज आहे कारण आपल्या समाजात अंधश्रद्धा अजूनही कायम आहे. आपल्याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरकच समजत नाही. ज्यावेळी समाज सुधारक या अंधश्रद्धांविरूद्ध बोलू लागतात लोकं घटनेच्या कलम २५ चा आधार घेऊन त्यांच्या धार्मिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप होत आहे असं भासवतात.'
अभय ओक यांनी हे वक्तव्य व्याखनमालेची थीम 'आपलं संविधान आणि वैज्ञानिक दृष्टीकोण विकसित करण्यासाठीची मुलभूत कर्तव्ये' याला अनुसरून व्याख्यान करताना केलं आहे.
माजी न्यायमूर्ती ओक यांनी व्याख्यानामध्ये संविधानातील भाग ४ नुसार मुलभूत कर्तव्ये तसेच भाग ३ नुसार देण्यात आलेल्या मुलभित अधिकारांवर जास्त भर दिला होता. त्यांनी आर्टिकल ५१ अ मधील कलम (g) आणि (h) याच्यावर भाष्य केलं. यामध्ये प्रत्येक नागरिकाची काय मुलभूत कर्तव्ये आहेत हे सांगितलं आहे.
आर्टिकल ५१ अ मधील कलम (g) मध्ये जंगल, तलाव आणि वन्य जीवनाचे रक्षण आणि त्यांचे नैसर्गिक पर्यावरण सुधारणे, तसेच जिवीत प्राण्यांप्रती दया भाव ठेवणे याचा समावेश आहे. तर कलम (h) मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण, मानवतावाद आणि चिंतन, सुधारणावादी दृष्टीकोण विकसित करणे याचा समावेश आहे.
माजी न्यायमूर्ती ओक पुढे म्हणाले की, 'पर्यावरणाबाबत सावधगिरीची भूमिका घेणं हे कायदेशास्त्राच्या आर्टिकल ५१ ए मध्ये आढळून येते.'