पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणात, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदिप घोष आणि ताला पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अभिजित मंडल यांना सीबीआयने शनिवारी (दि.14) रात्री अटक केली. संदीप घोष यांना रविवारी (दि.15) सियालदह न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या तपासात असे समोर आले आहे की संदीप घोष आणि कोलकाता पोलिसांचे एसएचओ दोघेही तपासात दिरंगाई करण्यात आणि पुराव्यांशी छेडछाड करून न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणण्यात गुंतले होते. घोष यांना सध्या प्रेसिडेन्सी सेंट्रल जेलमधील सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याला या आठवड्याच्या सुरुवातीला येथे आणण्यात आले होते. न्यायालयाने घोष यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. आरजी कार हॉस्पिटलमधील कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी सीबीआयने घोष यांना २ सप्टेंबर रोजी अटक केली होती.
एका कनिष्ठ डॉक्टरने सांगितले की, घटनेतील पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी आम्ही सर्व आंदोलक डॉक्टर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि ताला पोलिस स्टेशनचे एसएचओ अभिजीत मंडल यांना अटक करण्याची मागणी करत होतो. सीबीआयने त्याला अटक केल्यामुळे आम्हाला थोडा आधार वाटत आहे.
सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांची चौकशी केली असून सलग 15 दिवस संदीप घोष यांचीही चौकशी केली होती. संदीप घोष यांची पॉलिग्राफ चाचणीही घेण्यात आली. संदीप घोष यांच्यावर लेडी डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी तथ्य लपवल्याचा आरोप आहे. सत्याशी छेडछाड केल्याचा आरोप मृताचे आई आणि वडील सातत्याने करत आहेत. सुरुवातीला रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांना फोनवरून महिला डॉक्टरने जीवन संपवल्याचे सांगितले. नंतर हा बलात्कार आणि खुनाचा गुन्हा असल्याचे सिद्ध झाले.
संदीप घोष यांच्यावर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता. रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला. सीबीआयने सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान गुन्ह्याची जागा पूर्णपणे बदलल्याचेही सांगितले होते. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा तपास करणे अत्यंत अवघड होते. प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी संजय रॉयसोबत संदीप घोष यांच्यावरही संगनमताचा आरोप आहे.