

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : "मंदिरांमध्ये दिल्या जाणारा प्रसाद हे भाविकांसाठीश्रद्धेचे प्रतीक असते. यामध्ये भेसळ करणे निषेधार्ह आहे. भेसळीच्या बातम्यांमुळे भाविकांमध्ये संशय निर्माण होतो. हिंदू धर्मात प्रसादात भेसळ करणे हे पाप आहे," अशा शब्दांमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिरुपती प्रसाद वादावर चिंता व्यक्त केली.
बनारसमध्ये असताना बाबा विश्वनाथ यांच्या दर्शनाला जाऊ शकलो नाही; पण माझे काही मित्र दर्शनासाठी गेले होते. तिथून आल्यावर त्यांनी मला प्रसाद दिला, तो प्रसाद माझ्या हातात येताच मला अचानक तिरुपती मंदिराच्या प्रसादाची आठवण झाली. मी एकटा नाही, ज्याचा प्रसादावर अतूट विश्वास आहे. भाविकांसाठी प्रसाद हे श्रद्धेचे प्रतिक असून त्यात भेसळ करणे निषेधार्ह असल्याचे कोविंद यांनी सांगितले.
तिरुपती मंदिरात प्रसाद बनवताना गोमांस चरबी आणि माशांचे तेल वापर केला जात असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नमूद करण्यात आले होते. तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या तपासणीच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. याप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की, मागील सरकारच्या काळात तिरुपती मंदिराचा प्रसाद बनवताना तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती. हे आरोप लक्षात घेऊन मंदिरातून प्रसादाचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला होता, आता या तपासणीचा अहवाल आला आहे. या अहवालात प्राण्यांची चरबी वापरल्याची बाब समोर आली आहे.
या प्रकरणी वाढता वाद पाहून केंद्र सरकारनेही अहवाल मागवला आहे. कारवाई करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनीही याप्रकरणी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली आहे. या प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.