

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे (INLD) नेते ओम प्रकाश चौटाला यांचे (Om Prakash Chautala passes away) आज शुक्रवारी गुरुग्राम येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. चौटाला यांच्या निधनाबाबतची माहिती इंडियन नॅशनल लोक दलाचे मीडिया समन्वयक राकेश सिहाग यांनी दिली आहे.
ओम प्रकाश चौटाला यांना त्यांच्या घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली.
चौटाला हे सात वेळा आमदार राहिले. त्यांनी डिसेंबर १९८९ पासून विक्रमी चार वेळा हरियाणाचे मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा अंतिम कार्यकाळ १९९९ ते २००५ दरम्यान होता. चौटाला यांचा जन्म जानेवारी १९३५ मध्ये झाला होता. ते एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात आहेत. चौटाला हे चौधरी देवी लाल यांचे पुत्र आहेत. ज्यांनी भारताचे ६ वे उपपंतप्रधान म्हणून काम केले. देवीलाल हे हरियाणाचे मुख्यमंत्रीही होते.
त्यांचा एनडीए आणि तिसऱ्या आघाडीत अशा दोन्हींमध्ये सहभाग होता. जी २००९ मध्ये स्थापन झालेल्या पक्षांची युती होती; जी एनडीए अथवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचा भाग नव्हती. हरियाणात १९९९-२००० दरम्यानच्या कनिष्ठ शिक्षकांच्या नियुक्तीतील घोटाळ्याप्रकरणी त्यांना २०१३ मध्ये १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. साडेनऊ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर जुलै २०२१ मध्ये त्यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली होती.