पुढारी ऑनलाईन डेस्क : सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) माजी प्रमुख संजय कुमार मिश्रा (Former ED Chief SK Mishra) यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेत (ईएसी-पीएम) सचिव पदावर पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२५) जाहीर झालेल्या नियुक्तीची अधिकृत घोषणा होईपर्यंत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती.
संजय कुमार मिश्रा यांची २०१८ मध्ये ईडी प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. यानंतर त्यांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तिसर्यांदा दिलेली मुदतवाढ 'बेकायदेशीर' घोषित केली होती. यानंतर आता त्यांची आर्थिक सल्लागार परिषदेत (ईएसी-पीएम) सचिव पदी नियुक्ती करण्यात आले आहे.
संजय कुमार मिश्रा हे उत्तर प्रदेशातील १९८४ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी आहेत. २०१८ मध्ये ईडी प्रमुखपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. यांच्या चौकशीसह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला होता. यांच्याच काळात कर्नाटक काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री शिवकुमार, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, जम्मू आणि काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी, यांच्यासह अनेकाच्या चौकशी करण्यात आली होती.