अहमदाबाद; वृत्तसंस्था : भारताला स्वातंत्र्य मिाल्यानंतर गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध करणार्या शक्ती आजही सक्रिय आहेत. तुष्टीकरण करणार्यांचे कट्टरपंथीयांसमोर लोटांगण सुरू आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी देशाने सतर्क, संघटित आणि शक्तिशाली राहणे आवश्यक आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
1026 मध्ये महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर केलेल्या पहिल्या आक्रमणाला 1,000 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोमनाथ स्वाभिमान पर्वमध्ये पंतप्रधान बोलत होते. याप्रसंगी मोदी म्हणाले, सोमनाथचा इतिहास हा विनाश आणि पराभवाचा नसून विजय आणि नूतनीकरणाचा आहे. कट्टरपंथी आक्रमक आता इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित राहिले आहेत; परंतु सोमनाथ मंदिर आजही ताठ मानेने उभे आहे. द्वेष, अत्याचार आणि दहशतीचा खरा इतिहास आपल्यापासून लपवून ठेवला गेला आणि हे आक्रमण केवळ मंदिर लुटण्याचा प्रयत्न होता, असे आपल्याला शिकवले गेले, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
तत्पूर्वी, मोदी यांनी सोमनाथ मंदिरात शौर्य यात्रा काढली. यात्रेदरम्यान त्यांनी मंदिराच्या संघर्षाच्या इतिहासाचा उल्लेख करत एक मजबूत राजकीय आणि सांस्कृतिक संदेश दिला. या शौर्य यात्रेत 108 घोडे सामील झाले होते, जे शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक होते. ही यात्रा शतकानुशतके परकीय आक्रमणांपासून मंदिराचे रक्षण करताना प्राण अर्पण करणार्यांच्या सन्मानार्थ आयोजित केली होती.
वारसा आणि विकास
देशाचा समृद्ध वारसा ही अभिमानाची बाब असते. आपल्याकडे वारसा असतानाही गुलामी मानसिकतेच्या लोकांनी त्याची हेळसांड केली, अशी खंत व्यक्त करून मोदी म्हणाले, आजच्या काळात षड्यंंत्र अधिक सूक्ष्म पद्धतीने रचले जात आहे. अशा काळात आपल्याला एकता आणि दक्षता ठेवावी लागेल. सोमनाथला आधुनिक विकासाशी जोडताना पंतप्रधानांनी सोमनाथ संस्कृत विद्यापीठ, माधवपूर मेळा, गीर संवर्धन, केशोड विमानतळ विस्तार, अहमदाबाद-वेरावळ वंदे भारत ट्रेनपासून ते विकसनशील तीर्थक्षेत्र सर्किटपर्यंतच्या पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक विस्तार होत असल्याकडे लक्ष वेधले.